पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

संगोपन व पुनर्वसनाचा विचार किती सूक्ष्म करतात हे लक्षात येते.
 ‘एयुमीएन' (Ayumi-en) हे एरिनकाईमधील आणखी एक मतिमंद पुनर्वसन केंद्र पाहिले. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ लहान मुलांसाठी होते. वरील केंद्र हे मुले व माणसांसाठीच होते. या केंद्राचे काम अनिवासी स्वरूपाचे होते. मुले केंद्राच्या वेळात येत व परत आपल्या घरी जात. याची वेळ कार्यालयानुरूप असते. हे सांभाळ केंद्र (Day Care Centre) ही आहे, शिवाय बालवाडी, प्राथमिक शाळेसारखे पण चालते. असे असले तरी सोयी-सुविधांत काही कमी नाही. बालोद्यान, आहार, झोप, जिम्नॅशियम अशा विशेष सोयी इथे दिसल्या. याचे कारण मुलं घर, पालक यांना सोडून राहतात तर त्यांना घर, पालकांची आठवण होऊ नये. त्यांना इथे यायची ओढ लागावी अशी आकर्षणे (सोयी नव्हे) निर्माण करण्यात आलेली होती. नोकरी करणाच्या पालकांची मुले, उपचाराची गरज असलेली मुले इथे येत. इथले शिक्षक विशेष प्रशिक्षित होते. लहान मतिमंदांचे हे केंद्र त्यांचे मतिमंदत्व कमी करण्याकडे जसे लक्ष देते तसेच ही मुले इतर शाळेत लवकर कशी जाऊ शकतील या दृष्टीने प्रयत्न करते.
 'मेगुरो-केश्फु-रो' व 'एयुमिएन' या दोन्ही मतिमंदांच्या संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन केंद्रासाठी एरिनकाईमधील इतर संस्थांसाठी उपलब्ध सर्व सुविधा आपोआपच मिळतात. त्यात कॅटीन, दवाखाना, रंजनकेंद्र, छंदघर यांचा समावेश आहे. या सर्व सोयींचा एकत्रित विचार केला तर एरिनकाई म्हणजे जपानी नागरिकांनी मतिमंदांसाठी उभारलेली प्रतिसृष्टी वा स्वर्गच!
 मतिमंदांच्या प्रत्येक वैगुण्यावर विजय मिळवायचा चंग बांधलेली व्यवस्था पदोपदी लक्षात यायची. इतक्या छोट्या लेखात सारे शब्दबद्ध करणे केवळ अशक्य. तेथील शिक्षक, पालक, कर्मचारी मुलांचे शिक्षण, प्रशिक्षण, सांभाळ, मनोरंजन, भोजन भरवणं सर्व मनापासून करतात. केंद्रात वाचा, श्रवण, शरीर संबंधी सर्व दोषांच्या निदानाबरोबरच उपाचाराच्या कितीतरी सोयी होत्या. साधे प्रसाधनगृह पाहिले तरी त्यांच्या या क्षेत्रातील समृद्ध जाणिवेची कल्पना येते. तिथे मतिमंदांच्या नियंत्रित हालचालींचा/मर्यादांचा विचार करून आपोआप पाणी सुटणे, वॉशर, गरजेप्रमाणे खाली होणारे नळ, मुलांच्या उंचीप्रमाणे कमी अधिक उंचीवर लावलेली बेसिन्स, व्हीलचेअरवरून प्रसाधनगृहात नेण्याची सोय अशा सर्व बारीकसारीक गोष्टी सांगणे केवळ कठीण. मुलं इथे आनंदात असतात. इथे येण्याची त्यांची ओढ असते. घरातील पालकांना प्रशिक्षण देण्याची केंद्रात सोय होती. हे प्रशिक्षण पालकांना सक्तीचे असते. त्यासाठी

वंचित विकास जग आणि आपण/९१