पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

त्यांना रजा मिळते. प्रशिक्षण भत्ता, प्रवासखर्च, भोजन मिळते. प्रशिक्षण हे त्यांच्या पाल्यासह दिले जाते.
 टोकिओ शहरातीलच शिनागावा विभागातील 'फुकुई-काई' जगप्रसिद्ध कल्याण संस्था पाहता आली. वृद्ध व अपंगांच्या संगोपन, उपचारासाठी समर्पित ही संस्था पाहताना पदोपदी आपल्या देशात हे यायला किमान शतक उलटावे लागेल याची जाणीव होत होती. जपानमध्ये सामाजिक संस्थांतून दिली जाणारी सेवा तीन प्रकारची असते. एक असते सार्वजनिक. ती प्रशासकीय स्तरावर दिली जाते. याअंतर्गत शासनाचा कल्याण विभाग गरजूंना सेवा सुविधांची माहिती देणे व त्या पुरविण्याचे कार्य करतो. तेथील अधिकारी, कर्मचारी (शासकीय) गरजूंच्या दारी सेवा पुरविणे आपले कर्तव्य मानतात व ते प्रेमाने करतात. त्यात ‘शिवशाही आपल्या दारी' सारखा दांभिकपणा नसतो. तेथील अधिकारी स्वत:ला सेवक मानतात. आपल्या विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांना स्वखर्चाने जपान दाखवावा असे तेथील शासकीय विभागाच्या भेटीच्या वेळी वारंवार वाटत होते. ते हे सारं पाहताना शिष्टमंडळातील आपले शासकीय अधिकारी भलतेच अचंबित व अंतर्मुख होत होते. मी ते कधी विचारू शकणार नाही. काहीशी अशीच स्थिती माझ्याबरोबर या दौ-यासाठी सामील पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशच्या अधिका-यांची होत होती. दुसरी स्वयंसेवा ती सामाजिक संस्थांकडून विना मोबदला दिली जाते. तिसरी सेवा ही पैसे आकारून पुरविली जाते. त्याला ते ‘मार्केटेबल सर्व्हिस' म्हणतात. विशेष सेवांचा त्यात अंतर्भाव होतो. त्या खर्चीक असतात. पण सर्वांना उपलब्ध असतात. गरिबांच्या या सेवेचा खर्च सामाजिक सुरक्षा योजनेतूनच होतो. अशा प्रकारे विविध देवा पुरविणाच्या १४000 संस्था जपानमध्ये आहेत. जपान कल्याण कार्यावर (सार्वजनिक) २६,000,000,000 येन म्हणजे ९0,00,000 रुपये दरडोई खर्च करते. सामाजिक संस्थांना दिले जाणारे अनुदान दिलेल्या कालावधीत खर्च करणे बंधनकारक असते. ठरावीक वेळेत पैसा लाभार्थीपर्यंत न पोहोचल्यास शासन संस्थांना जाब विचारते. शासन सामाजिक संस्थांना मोफत जागा देते. ही जागा विशेष म्हणजे मोक्याच्या ठिकाणी देण्यावर शासनाचा कटाक्ष असतो. तिथे गरजूंना येता आले पाहिजे असा शासन विचार करते.
 ‘फुकई-काई' मधील ‘शिनोकी' नावाची मतिमंदांची शाळा पाहिली. मतिमंद मु|लांचै दैनिक जीवन सुसह्य करण्यास साहाय्य करणारी ही शाळा. या शाळेचे दोन विभाग होते. एकात शिक्षण दिले जायचे. दुसरी पुनर्वसनाचे काम

वंचित विकास जग आणि आपण/९२