पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

‘विना नफा संस्था' (Non Profitable Organisation) म्हणून चालवणे बंधनकारक असते. या नि अशा किती तरी गोष्टी आहेत की ज्या समजून घेतल्याशिवाय आपणास तिथे संस्था सेवा कशा देऊ शकतात हे समजून येणार नाही.
 टोकिओ या जपानच्या राजधानीत एका विभागास ‘एयरिनकाई' (Airinkai) संस्थेस पहिल्याच दिवशी भेट देण्याचा योग आला. पूर्वी अमेरिकन सेनेच्या बराकीत चालविण्यात येणारी ही संस्था. आता त्यांनी तिचे पुनरुज्जीवन केले आहे. वृद्धांची शुश्रूषा, वृद्धांसाठी संस्थाबाह्य सेवा, मतिमंदांचे पुनर्वसन केंद्र, मतिमंदांचे संगोपन केंद्र, बालवाडी, अनाथाश्रम, पत्नीहीन पतीचे आश्रय केंद्र, शाळकरी मुलांचे छंद केंद्र, दवाखाना अशा सर्व सेवा पुरविणारी ही संस्था. एकीकडे सेवा वैविध्य तर दुसरीकडे सुविधांचा अधिकाधिक वापर.
 एयरिनकाईत असलेल्या 'मेगुरो-केश्फु-रो' या मतिमंदांच्या पुनर्वसन केंद्रास भेट दिली. १९७० साली ही संस्था सुरू झाली. १00 मुला-मुलींचे संगोपन व पुनर्वसन कार्य करणा-या संस्थेत ५४ कर्मचारी आहेत, हे ऐकल्यावर माझा प्रथम विश्वासच बसला नाही. पण प्रत्यक्ष काम पाहताना माझ्या लक्षात आले की, तेथील कर्मचारी ज्या तळमळीने मुलांची काळजी घेत होते, ते पाहता ही संस्था अपुरी आहे असे वाटले. तिथे २ विद्यार्थ्यांमागे १ कर्मचारी असतो. आपल्याकडे हे प्रमाण १0:१ आहे. आपले काम किती मागे आहे याचे ते द्योतक आहे. या केंद्रात मतिमंद मुलांना औपचारिक शिक्षणापेक्षा अर्थार्जन व स्वावलंबनाच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते. टाकाऊ पॅकिंग्जपासून कागद बनवणे, भेटवस्तू तयार करणे, चित्रे, वॉल हँगिंग्ज अशा वेगवेगळ्या प्रशिक्षणाची सोय आहे. साधारण पाच मुलांचा एक गट, दोन कर्मचारी. त्यापैकी एक प्रशिक्षक व एक काळजीवाहक अशी रचना असते. या केंद्रात प्रत्येक उद्योगास स्वतंत्र खोली होती. ती साधनसंपन्न होती. केंद्राचा सारा परिसर
 आंतर्बाह्य सजावटीने युक्त होता. कच्चा माल विपुल होता. हे केंद्र आपत्कालीन स्थितीत घरातील मतिमंद मुलांचाही सांभाळ करते. केंद्रात दोन्ही प्रकारची मुले असतात. संस्थेत राहणारी व घरून येणारी. प्रशस्त इमारतीत कार्यशाळा, शिक्षकालय, भोजन कक्ष, बहुउद्देशीय सभागृह, खेळघर, निवारा अशी रचना होती. कर्मचा-यांत संचालक, शिक्षक, काळजीवाहक, डॉक्टर, नर्स, आहारतज्ज्ञ, मसाजी, मज्जातंतू विशेषज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, चालक, वीजतंत्री, समाज कार्यकर्ता, छंद शिक्षक, संगीत शिक्षक, प्रशिक्षक, आचारी, सफाई कामचार, माळी, बालचिकित्सक अशांचा समावेश पाहता जपानी लोक मतिमंदांच्या

वंचित विकास जग आणि आपण/९0