पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

मदत. या सर्वांचा विचार करून पूर्ण पुनर्वसन प्रक्रियेचे खालील घटक मानण्यात आले आहेत.

१. अपंग शोधन


 समाजान अपंगांचे असलेले प्रमाण व अपंगांना पुनर्वसनाच्या मिळणाच्या सुविधांचे प्रमाण पाहता एक गोष्ट लक्षात येते की, समाजातील गरजू अपंगांपैकी फारच थोड्या (खरे तर अपवादात्मक) अपंगांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध होते. हे लक्षात घेऊन सर्वेक्षण शिबिरे, जनगणना इ. व्यापक यंत्रणेमार्फत प्रत्येक अपंगांची त्यांच्या व्यंगासह नोंद घेऊन प्रत्येक अपंग शोधून काढणे आवश्यक आहे. तसे झाल्यास पुनर्वसन कार्याचा आवाका किती मोठा आहे व संधी किती तुटपुंज्या आहेत हे स्पष्ट होईल.

२. वैद्यकीय चिकित्सा


 अपंग शोधून काढल्यानंतर त्यांच्या अपंगत्वाचे निदान करण्यासाठी अशा अपंगांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. अशा तपासणीमुळे अपंगत्वाची कारणमीमांसा, अपंगत्वाचे प्रमाण, स्वरूप इ. गोष्टी हाती येणे शक्य असते. यामुळे उपचाराचे नियोजन सुलभ होते.

३. वैद्यकीय उपचार


 अपंगत्वाची कारणे व स्वरूप कळाल्यावर अपंगत्व दूर करण्यासाठी शक्य ते वैद्यकीय उपचार करणे ही पुनर्वसनाची प्राथमिक पायरी असते. यात औषधोपचार, शस्त्रक्रिया, शरीरोपचार, व्यायाम, मसाज इ. अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. पुनर्वसन प्रक्रियेप्रमाणे वैद्यकीय उपचारही एक सतत चालत राहणारी प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

४. व्यावसायिक मूल्यमापन


 अपंगत्व शोधून उपचाराद्वारे ते नियंत्रित केल्यावर अपंगांच्या पुनर्वसनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यात असलेले व्यावसायिक कौशल्य शोधणे आवश्यक असते. त्याचा मार्ग म्हणजे व्यावसायिक मूल्यमापन होय. अपंगांच्या व्यावसायिक मूल्यमापनात व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक सर्व माहिती संकलित करून देऊन कौशल्य निर्मितीच्या सर्व शक्यतांची पाहणी करणे गरजेचे असते. यासाठी अपंगत्वाचे स्वरूप, वय, समायोजक शक्ती, कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक पाठबळ इत्यादी गोष्टी लक्षात घ्याव्या लागत असतात.

५. व्यावसायिक मार्गदर्शन


 अपंगाचे व्यावसायिक मूल्यमापन झाल्यावर शक्यतांच्या संदर्भात त्यास

वंचित विकास जग आणि आपण/७३