पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

व्यावसायिक मार्गदर्शन करावे लागते. अपंगांपुढे सर्व संभव पर्याय ठेवून निवडीचे स्वातंत्र्य व मार्गदर्शन दिल्यास अनुकूल परिणामाची शक्यता वाढत असते. याची सुरुवात व्यक्तिगत चर्चेपासून सुरू होऊन व्यवसायात अपेक्षित यश व स्थैर्य मिळेपर्यंत मार्गदर्शन चालू राहिले पाहिजे. मार्गदर्शन केवळ प्रारंभासाठी देऊन चालणार नाही, तर अडचणीच्या प्रत्येक क्षणी अपंगास मार्गदर्शन उपलब्ध असले पाहिजे. तसे झाल्यास अपंगांना एकटेपणाची व अलगपणाची जाणीव होणार नाही.

६. व्यावसायिक प्रशिक्षण


 व्यावसायिक मूल्यमापन व मार्गदर्शनातून निश्चित करण्यात आलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण हे व्यावसायिक कौशल्यप्राप्ती व सफलतेसाठी आवश्यक असते. अपंगांमध्ये स्वावलंबन निर्माण करण्यात व्यावसायिक प्रशिक्षणाचा सिंहाचा वाटा असतो, हे विसरून चालणार नाही. यासाठी अशा संस्थांत अपंगांना प्राधान्य देणे जसे गरजेचे आहे. तसेच खास अपंगांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने व्यावसायिक प्रशिक्षण संस्था स्थापन केल्या गेल्या पाहिजेत.

७. देखभाल


 वैद्यकीय उपचार व व्यावसायिक प्रशिक्षण या दोन्ही प्रक्रियेत अपंगांची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. योग्यवेळी सर्व औषधे, आहार, उपकरण साधने इ. पुरवठा होऊन त्यांच्या संगोपन व काळजीसाठी अहोरात्र मेहनत घ्यायला हवी. यासाठी लागेल तितके अर्थबळ पुरविले गेले तरच अपेक्षित परिणाम हाती येणे शक्य असते. यासाठी वसतिगृहे, रुग्णालये, प्रशिक्षण केंद्रे, सेवायोजन केंद्रे यांचे परस्परपूरक जाळे विणणे गरजेचे आहे.

८. सुस्थापन


 अपंगत्वावर अंशत: अथवा पूर्णत्वाने मात करून अथवा शारीरिक त्रुटी पर्यायी साधन, उपकरणाने दूर करून उर्वरित अपंगत्वासह अपंगांना समाजात इतर सामान्य नागरिकांप्रमाणे जगण्या-झगडण्याची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे त्या अपंगाचे सुस्थापन व पुनर्वसन होय. अपंगाना अर्जनशील, अर्थार्जनशील बनवणे इतकेच अल्प उद्दिष्ट ठेवून आजवर अपंगांच्या सुस्थापनेचा विचार करण्यात आला आहे, याचे मुख्य कारण आपण अपंगांना जुजबी बळ देण्यात सुख मानतो. समाज अपंगांबाबत नेहमी अल्पसंतुष्ट राहिला आहे. अपंगांना केवळ अर्थार्जनशील बनवून चालणार नाही, तर अपंग सर्जनशील, सर्जनशील कसे होतील याचा ध्यास आपण घ्यायला हवा. ‘आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे' वाटण्याइतका प्रयत्न या संदर्भात व्हायला हवा.

वंचित विकास जग आणि आपण/७४