पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अपंगांच्या पूर्ण विकासाची व त्यांना सामान्य (Normal) नागरिक बनविण्याची सर्व शक्यता आज निर्माण झाली आहे. आज समाजास या गोष्टीची जाणीव झाली आहे की शिक्षण, प्रशिक्षणाद्वारे अपंगांचे पुनर्वसन करता येऊन समाज विकासात त्यांचे योगदान शक्य आहे. ही भावना आज प्रतीकात्मक स्वरूपात मूळ धरत असली, तरी भविष्यकाळात ही शक्यता वाढत राहणार आहे. अपंगांच्या शारीरिक, मानसिक, व्यावसायिक, बौद्धिक क्षमतेच्या आशावादी विकासामुळे अशी शक्यता आता कल्पनेच्या पातळीवरून दृष्टीच्या टप्प्यात आली आहे. अपंग स्त्री, पुरुष व मुले-मुली यांना दिली जाणारी उपकरणे, संधी, प्रावीण्य पाहता ते सर्व नजीकच्या काळात धडधाकट माणसांच्या खांद्यास खांदा भिडवून मार्गक्रमण करू शकतील. या सर्व आशा त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात केल्या जाणाच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचेच फळ म्हणावे लागेल.
 समाजातील अपंगांच्या विकासाचा अनिवार्य भाग म्हणून पुनर्वसन कल्पनेचा स्वीकार व्हायला हवा. अपंग व्यक्तीतील शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक सुप्त शक्तींचा संपूर्ण विकास म्हणजे पुनर्वसन' इतक्या व्यापक आशयाने पुनर्वसनाकडे पाहण्याची गरज आहे. केवळ कुबड्या दिल्या, तिचाकी सायकल दिली, श्रवणयंत्रे दिले की स्वर्ग दोन बोटे उरल्याचा आनंद मिळविणाच्या अपंगाधार संस्था व कार्यकर्त्यांना पुनर्वसनाचा व्यापक क्षितिज जोवर कळणार नाही, तोवर अपंगांचे खरे पुनर्वसनच होऊ शकणार नाही. १९५० साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत डॉ. हॉवर्ड रस्क यांनी अपंगांच्या पुनर्वसनाच्या प्रवासाचा मार्ग अत्यंत वेधक व वेचक शब्दांत स्पष्ट केला होता. ते म्हणाले होते की, 'मरणासन्न स्थितीपासून जीवन संघर्ष साधनेपर्यंत पुनर्वसनाचा मार्ग दूरवर पसरला आहे. या सुंदर पसरलेल्या महामार्गास मिळणाच्या अनेक छोट्या रस्त्यांपैकी व्यावसायिक पुनर्वसन हा एक रस्ता होय.
 अपंगांचे व्यावसायिक पुनर्वसन ही सतत चालणारी समन्वयात्मक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत व्यावसायिक सुविधा, व्यावसायिक मार्गदर्शन, व्यावसायिक प्रशिक्षण इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होतो. संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेल्या व्यावसायिक पुनर्वसन प्रक्रियेत खालील गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे-१) निदान व चिकित्सा सुविधा २) मार्गदर्शन ३) शारीरिक त्रुटींची। परिपूर्ती ४) प्रशिक्षण ५) शिक्षण व प्रशिक्षण साधने (पुस्तके, उपकरणे इ.) ६) देखभाल ७) सुस्थापन ८) उपकरणे इत्यादींचा संग्रह व पुरवठा ९) व्यावसायिक परवाने मिळवून देणे १0) परिवहन सुविधा ११) इतर आवश्यक

वंचित विकास जग आणि आपण/७२