पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

संयुक्त राष्ट्रसंघाने १९९४ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय कुटुंब वर्ष' म्हणून जाहीर करत असताना आणखी एक घोषणा केली आहे. ती अशी की प्रत्येक वर्षी ‘१५ मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन' म्हणून साजरा केला जावा. या मागेदेखील संयुक्त राष्ट्रसंघाची या उपेक्षित घटकाविषयी प्रतिवर्षी विचार करण्याची, प्रबोधन घडवून आणण्याची मनीषा स्पष्ट होते नि ती योग्य म्हणायला हवी. जगातील ब-याच राष्ट्रात ‘कुटुंब दिन’, ‘माता दिन', 'पिता दिन' पाळण्याचे प्रघात आहेत. त्याऐवजी जगभर साकल्याने, समग्रतेने समाज, अर्थ, संस्कृती, राजनीती सर्वांसंदर्भात कुटुंबाचा या दिवशी एकात्मिक विचार व्हावा अशी भावना आहे.
 या सर्वांमागे एक तात्त्विक बैठक आहे नि ती सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे. कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक होय. त्यामुळे त्याकडे विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे. यासाठी कुटुंबास सर्व ते संरक्षण व साहाय्य मिळायला हवे. तरच ते समाजाच्या संदर्भातील आपल्या जबाबदाच्या पूर्ण करू शकेल. मानव हक्कांच्या पालनाच्या अनुषंगाने येणारी ही मूलभूत बाब होय. विशेषतः कुटुंबात 'स्त्री'वर असणारी जबाबदारी व कुटुंबात तिला दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक, तिचे होणारे शोषण, तिच्यावर होणारा अन्याय या संदर्भात या वर्षी अधिक गांभीर्याने विचार व्हायला हवा. पूर्वी घरातील स्त्रीस, पत्नीस ‘कुटुंब' म्हणण्याचा प्रघात होता. या प्रघातात स्त्रीवर असलेले ओघं, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगा उद्धारी' सारखी जबाबदारीच स्पष्ट होते. प्रत्येक देशात कुटुंबाचे स्वरूप व कार्य भिन्न आहे. यातून वैश्विक विविधताच स्पष्ट होते. अशा सर्व विविधतेत एकता निर्माण करण्याचा उद्देश या वर्षामागे आहे. प्रत्येक व्यक्तीस मूलभूत मानवी हक्क प्रदान करून तिच्या स्वतंत्र विकासाचे आश्वासन देणे ही या वर्षाची धडपड असायला हवी. कुटुंबात स्त्री-पुरुषाचा दर्जा समान ठेवण्यावर भर देण्याची अपेक्षा हे वर्ष करते. समाजात लोकशाही मूल्ये व जबाबदा-यांचे बीज पेरण्याचे माध्यम म्हणून या वर्षाकडे पाहिले जाते अशी अपेक्षा आहे. सर्वांना रोजगाराच्या समान संधी पुरविल्या जातील तर कुटुंबातील स्त्रीपुरुषातील असंतुलन दूर होणे शक्य आहे, याची जाणीव हे वर्ष देईल यात शंका नाही. कुटुंब हे व्यक्तिविकासाचे केंद्र असते. कुटुंबाचे बलस्थान अधिक बळकट करण्यावर या वर्षी लक्ष केंद्रित केले जावे, अशा अपेक्षा आहे. स्वावलंबन, स्वाभिमानासारखी मूल्ये जोपासण्याची प्रयोगशाळा म्हणून कुटुंबाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा आहे. एकात्मिक भावना (समाज, राष्ट्र, विश्व) सर्वांसंबंधात विकसित करण्याचे माध्यम म्हणून कुटुंब विकसित

वंचित विकास जग आणि आपण/६८