पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

पडण्यासाठी. पक्षालाही नि माणसालाही! असं असून या वर्षाची होणारी उपेक्षा, त्याचं कारण या वर्षाचे गांभीर्य न कळणे एवढेच आहे.
 संयुक्त राष्ट्रसंघ एखादे कार्य विशिष्ट विषयास जेव्हा समर्पित करण्याचे ठरवतो. त्यामागे दीर्घकालीन चिंतन, अनुचिंतन, चर्चा, नियोजन असते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने ८ डिसेंबर, १९८९ ला ४४/८२ क्रमांकाच्या ठरावाने १९९४ वर्ष हे ‘कुटुंब वर्ष' म्हणून जाहीर करण्याचे ठरवले व पाच वर्षांच्या दीर्घ नियोजनानंतर २० सप्टेंबर १९९३ च्या आमसभेत त्यावर विधिवत शिक्कामोर्तब केले. हे वर्ष जाहीर करत असताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षांनीही श्री. बुद्रस घाली यांनी 'Building the smallest democracy at the heart of society' यासारख्या शब्दांत या वर्षाबद्दलच्या आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील नुकत्याच घडून आलेल्या स्थित्यंतराने या वाक्याचं गहिरेपण अधिक जाणवतं. या वाक्याने मला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्या संदर्भात १९८१ मध्ये मुंबईत संपन्न झालेल्या समांतर साहित्य संमेलनात मालतीबाई बेडेकरांनी सांगितलेल्या प्रसंगाचे पुन:स्मरण दिले. रुझवेल्ट राष्ट्राध्यक्ष असताना आपल्या कामात सतत गर्क असायचा. पण आठवड्यातून एक दिवस विशेषतः रविवार तो आपल्या कुटुंबासाठी राखून ठेवायचा. त्या दिवशी घरातील सर्व जण पांढरी टोपी परिधान करीत. ती टोपी समानतेचे प्रतीक असायची. त्या दिवशी सगळ्यांना, सानथोरांना एकमेकांबद्दल बोलण्याची, टीका करण्याची मुभा असायची. रुझवेल्ट सर्वांचे संयमाने ऐकायचे. पुढील आठवड्यात प्रत्येकजण आत्मपरीक्षण करून चुका टाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा. रुझवेल्टचे कुटुंब तुटले नाही, दुभंगले नाही, ते घरात जोपासलेल्या लोकतंत्रात्मक नीतीमुळे. घर-कुटुंबांनी बनतो समाज, समाजाचे होते राष्ट्र, राष्ट्रांनी आकारते विश्व, ‘हे विश्वचि माझे घर' चा संदेश देणारे हे वर्ष, सर्वांनी अंतर्मुख होऊन आचारायला हवे. रुझवेल्टची आठवण ठेवायला हवी, घर तुटू नये म्हणून, कुटुंब दुभंगू नये म्हणून.
  या वर्षाचं मला एक आगळे महत्त्व वाटतं. आजवरची वर्ष पाळायची वर्ष होती, शासनाने, संस्थांनी, संघटनांनी. हे वर्ष प्रत्येकासाठी आचारधर्माचे आव्हान घेऊन आले आहे. प्रत्येकाने आपले कुटुंब जपले तर ते जग जपल्यासारखे होणार आहे. जग आज सर्वार्थाने विभाजनाच्या उंबरठ्यावर उभे आहे. ज्वालामुखीवर वसलेल्या गावासारखे. वरून निद्रिस्त पण आतून अस्वस्थ काँक्रिटच्या जंगलात कुटुंबातील वात्सल्य, प्रेम, आपुलकी, त्याग, समान हितसंबंध जपण्याची ओढ, सहकार्य भावना, सर्वथा लोपल्याची स्थिती आहे नि म्हणून हे वर्ष ‘कुटुंब वर्ष' म्हणून जाहीर केले आहे.

वंचित विकास जग आणि आपण/६७