पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

व्हायला हवे. याचा सतत पाठपुरावा होत राहण्यासाठी प्रतिवर्षी ‘कुटुंब दिन पाळण्याचे आचरण्याचे आवाहन करणेत आले आहे. त्याचे महत्त्व वरील विवेचनावरून स्पष्ट होते.
 कुटुंबाची बदलत्या जगात असलेली जबाबदारी पूर्ण व्हायची तर सरकारी व खासगी दोन्ही स्तरांवर जागृती होणे गरजेचे आहे. कुटुंबाचे मानव जीवन विकासातील असाधारण महत्त्व व स्थान असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी व सतत ‘कुटुंब' हा विषय केंद्रगामी राहण्यासाठी ‘कुटुंब वर्ष' व 'कुटुंब दिन' पाळायला हवा. कुटुंबाचे प्रश्न, कार्य, जबाबदा-या समजून घेण्यासाठी या वर्षाचा वापर होणे गरजेचे आहे. कुटुंबविषयक प्रश्नांची चिकित्सा करणाच्या राष्ट्रीय संस्था विकसित होण्याची व त्या स्थिर व समृद्ध करण्याची आज गरज आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर, शासन व स्वयंसेवी संस्थांनी परस्पर सामंजस्याने कुटुंबविषयक प्रश्न सोडवण्यावर भर द्यायला हवा. स्त्रिया, मुले, युवक, वृद्ध, अपंगांसंदर्भातील सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर एकोप्याने व्हायला हवे. अशी किती तरी उद्दिष्टे उराशी बाळगून संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष ‘कुटुंब वर्ष' म्हणून जाहीर केले आहे.
 जगाचे बदलते संदर्भ, प्रत्येक क्षण वाढणारी गती, या सर्वांमुळे खरे तर माणसाच्या जगण्याचे संदर्भच बदलून गेले आहेत. या बदलत्या संदर्भामुळे कुटुंबाचा संदर्भ बदलणे अपरिहार्य आहे. कुटुंब ही माणसाची निर्मिती आहे. गरजेतून निर्माण झालेली व प्रयत्नाने सिद्ध झालेली. कृषिपूर्व युगात मनुष्याचे कुटुंब नव्हते, गट होते, टोळ्या होत्या. प्रेमपूर्वक संगोपन, स्नेहमय सहजीवन, परस्पर विश्वास, व्यक्तीस प्रतिष्ठा प्रदान करण्याच्या लालसेतून गटाची जागा कुटुंबांनी घेतली. विवाह, रक्तसंबंध, दत्तकविधान, एकत्र निवास इत्यादींनी बांधलेल्या स्त्री-पुरुषांचे कुटुंब झाले. निवासस्थान, स्वयंपाक, स्थावरजंगम मालमत्ता, मिळकत, खर्च, जबाबदा-या इत्यादींनी एकमेकांना बांधलेल्यांचे कुटुंब झाले. यातून नाती-गोती, जाती-पाती आणि धर्म उदयाला आले आहेत. त्यातून समाज बनला, राष्ट्र बनले आहे, जग आकारले. पण कुटुंबाच्या संदर्भातील श्रम विभाजन, सत्ता केंद्र, अधिकार भावना यांच्या बदलत्या जाणिवांनी संयुक्त कुटुंबे विभाजित झाली. केवळ चुली वेगळ्या झाल्या नाहीत, आडी वेगळी झाली नाहीत, तर मनेही वेगळी झाली. उद्योगीकरण, नागरीकरण, वैज्ञानिकता, व्यक्तिवाद, अर्थ संबंधातील बदलाने मानवी संबंधांनाच छेद बसला. विवाहाच्या कल्पना बदलल्या. महाभारत कालीन ‘आम्ही एकशेपाच'चा आदर्श गाडला जाऊन 'मी' पर्यंत माणसाची मजल गेली. कधी काळी घरात विधवा, लुळ्या-पांगळ्यांचा प्रेमाने सांभाळ करणारे कुटुंब

वंचित विकास जग आणि आपण/६९