पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

पुनर्वसनाचे, भावनिक सबलीकरणाचे तसेच आर्थिक स्वावलंबनाचे जे प्रयत्न झाले ते खोलात जाऊन आपण समजून घेतले पाहिजे.
 अपंगांचे मानसिक पुनर्वसन म्हणजे अपंगाने स्वत:ला अपंग न मानणे होय. युरोपमधील सर्वसाधारण अपंगात ही मनोभूमिका आढळते. स्वत:स अगंप मानणे म्हणजे स्वत:स दुर्बल, कमजोर मानणे होय. युरोपमधील जवळजवळ सर्वच देशात अपंगांच्या सामाजिक स्वास्थ्य व सुरक्षेच्या योजना आहेत. त्या योजना वा प्रकल्पांना तेथील अपंग आपल्या अंत्योदयाचा राजमार्ग मानीत नाहीत. या योजना म्हणजे अपंगांच्या स्वप्रयत्नास केलेले सामाजिक सहाय्य असते. शिवाय अशी सहाय्यता ते आपले हात टेकल्यानंतर स्वीकारतात, हे सर्वांत महत्त्वाचे. हाच त्यांच्या नि आपल्या मनोवृत्तीतील मूलभूत फरक होय. युरोपातील अपंगांची ही मनोभूमिका तयार होण्याची अनेक कारणे आहेत. ती कारणे व उपाय आपले आदर्श व्हायला हवेत.
 युरोपच्या दौ-याची मी सुरुवात केली ती पॅरिसपासून. पॅरिसचं ते भलं, मोठं जगप्रसिद्ध विमानतळ 'चार्ल्स द गॉल' नावाने ओळखलं जातं. आमच्या स्वागताला फ्रान्समधील भारत मित्र मंडळाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात एक अपंग कार्यकर्ता होता. स्वागत समारंभ उरकून आम्ही निघत होतो. सरकत्या जिन्याने आम्हास जायचे होते. मी त्या अपंगास मदतीचा हात पुढे केला. त्याने नम्रतेने नाकारला नि म्हणाला, ‘‘माझी नका काळजी करू. मला सवय आहे. शिवाय राज तुम्ही थोडे असणार आहात? पुढे तो मला म्हणाला, “तुम्ही स्वत:ला सांभाळा, तुमच्या देशात असे जिने नाहीत हे मला माहीत आहे. ही गोष्ट १९९० ची. खाली आल्यावर त्यानं आदबीनं विचारलं, “सामान घेऊन उतरता आलं ना? आता तुम्ही स्वावलंबी झालात. त्याच्या या वाक्यानं मात्र मला अपंग केलं होतं, असं आज आठवतं. मी पाहिलं की तो दूरपर्यंत आमच्याबरोबर चालत राहिला. इतकंच नव्हे, तर गाडीत सामान भरायलाही त्यानं यथाशक्ती हातभार लावला. हे सारं होतं कशामुळे म्हणाल तर अगदी लहानपणापासून त्याला स्वावलंबी बनवलं गेल्यामुळे, अगदी कुत्र्या-मांजराच्या पिलासारखं. कुत्र्याचं पिलू लवकर स्वावलंबी होतं, पोहतं, अन्न शोधतं, मिळवतं, पाणी पितं अगदी तसं. या उलट आपल्याकडे अपंगांना घरी, दारी, शाळेत, सार्वजनिक ठिकाणी मदत करून स्वावलंबी बनूच दिलं जात नाही. तिथे मागितल्याशिवाय मदत केली जात नाही. मदत मागणं कमीपणाचं मानलं जातं.
 युरोप दौ-यात मी जर्मनीहून हॉलंडला गेलो. मला झेइस्टला जायचं होतं. मी रेल्वेने उतरून बस पकडण्यासाठी म्हणून बस स्टॅडवर उभा होतो. दुपारचे

वंचित विकास जग आणि आपण/५८