पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

संस्थेची स्थापना केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतात श्रीमती फातिमा इस्माईल यांनी सन १९५७ मध्ये मुंबईत ‘फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप्ड (एफपीएच) या संस्थेची स्थापना केली.
 गेल्या पन्नास वर्षांतील अपंगांचे पुनर्वसन पाहता माझ्या हे लक्षात आले आहे की, आपल्या देशात अपंगांचे पुनर्वसन हे भौतिक सुविधा पुरविण्यावर भर देणारेच राहिले आहे. त्या अर्थाने हे भौतिक पुनर्वसन म्हणजे केवळ साधन पुरवठा (कुबड्या, तिचाकी, श्रवणयंत्रे इ.) होय. एखाद्या लंगड्या माणसाला ‘जयपूर फूट' दिला कीत याचं झालं पुनर्वसन, तो झाला अव्यंग. लंगड्या माणसाच्या बाजूने विचार करता ती त्याच्या अनेक गरजांतील ती एक असते. आपण एक देऊनच पुनर्वसन संपवतो. हा आपला भ्रम आहे म्हणा किंवा अपंकांच्या पूर्ण पुनर्वसन कल्पनेबाबत आपण अनभिज्ञ आहोत म्हणा. यातून फक्त त्याची शारीरिक गरज भागते. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही अपंगाचं पूर्ण पुनर्वसन हे त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक,

आर्थिक, सामाजिक गरजांच्या पूर्ततेतूनच शक्य होते. या अर्थाने आजवर केलेले अपंग पुनर्वसन प्रयत्न हे तोकडेच म्हणावे लागतील.
 या संदर्भात युरोपमध्ये करण्यात आलेले अपंग पुनर्वसनाचे प्रयत्न आपण समजून घ्यायला हवेत. ते सारे प्रयत्न आपल्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत, असा माझा अनुभव आहे. फ्रान्स-भारत मैत्री व सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत मी पुण्याच्या फ्रान्स मित्रमंडळामार्फत मुख्यतः फ्रान्सला गेलो होतो. नंतर तिथे राहून युरोपच्या अनेक देशांना भेटी दिल्या. फ्रान्सशिवाय मी इंग्लंड, स्विट्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, लक्झेंबर्ग, व्हॅटिकन, बेल्जियम, जर्मनी, हॉलंड इत्यादी देश पाहिले. मला आठवतं की युरोपच्या सुमारे दोन महिन्यांच्या वास्तव्यात माझे मित्र आयफेल टॉवर, पिसाचा मनोरा, व्हॅटिकन चर्च, व्हर्सायल राजवाडा, लूर म्युझियम, फॅशन शो पाहण्यात दंग होते. मी मात्र अनाथालये, अपंग संस्था, पुनर्वसन केंद्रे, शाळा शोधून-शोधून पाहात होतो. युरोपमधील सामाजिक सुरक्षा, सामाजिक स्वास्थ्य, युवक कल्याण, महिला संरक्षण, अपंग पुनर्वसन इत्यादी कार्य पाहात असताना माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे युरोपीय समाज सामाजिक प्रश्नात शॉर्टकट शोधत नाही. पैशाची तक्रार करत नाही. प्रश्न मुळापासून समजावून घेऊन त्याच्या उच्चाटनास ते लोक प्राधान्य देतात. त्यामुळे युरोपमधील अपंगांना त्यांची कोणी दया केली की तिटकारा येतो. दुस-या महायुद्धानंतरच्या काळात युरोपीय देशात भौतिक साधन संपन्नतेबरोबर अपंगांच्या मानसिक

वंचित विकास जग आणि आपण/५७