पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


अपंगांच्या मानसिक पुनर्वसनाचे प्रयत्न


 माणसाचं अपंगत्व माझ्या दृष्टीनुसार एक व्यापक संकल्पना आहे. दैनंदिन जीवनात लुळे, पांगळे, थोटके, मुके, बहिरे, अंध, मतिमंद यांनाच आपण अपंग समजतो. सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉ. हेन्री किसलर एकदा असं म्हटले होते की, जगातील एक चतुर्थांश लोक अपंग आहेत. तेव्हा जगाने त्यांना वेड्यात काढले होते. आज त्यांच्या म्हणण्यातील तथ्य जगाच्या लक्षात आले आहे. वरून धट्टा-कट्टा दिसणारा माणूस सामाजिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या अपंग असू शकतो. हे आज आपणास माहीत झाले आहे. एक काळ असा होता की दृश्य अपंगत्वच अपंगत्व मानले जायचे. पण आज अपंगत्वाची कक्षा वर सांगितल्याप्रमाणे रुंदावली आहे. अनाथ, वृद्ध, परित्यक्ता इत्यादींना आज सामाजिक अपंग (Socially Challenged) मानले जाते, हे या संदर्भात लक्षात घ्यायला हवे. बेरोजगार, भूमिहिनांना आपण आर्थिक निकषांच्या आधारे आर्थिक दुर्बल मानतो, तोपण अपंगत्वाचा एक प्रकारच होय. एखादी गोष्ट नसणं, माणूस एखाद्या गोष्टीपासून वंचित असणं अपंग असणंच होय. डॉ. हेन्री केलर यांच्या मताशी आता आपणही सहमत व्हाल.
 अपंगाच्या पुनर्वसनाचा विचार विकासाचा प्रवासात रोज व्यापक होत चालला आहे. एके काळी अपंगांचे पुनर्वसन हे दया, धर्म, करुणेचा एक भाग समजला जायचा. आज अपंगांचा अधिकार, हक्क म्हणून आपण पुनर्वसनाकडे पाहतो. पूर्वी अपंगांचे पुनर्वसन धार्मिक सहिष्णुतेचा भाग म्हणून केले जायचे. दुस-या महायुद्धातील भीषण नरसंहारामुळे असंख्य मदतीचे हात पुढे आले. स्वयंसेवी संस्थांची निर्मिती झाली. आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झाल्या. युनो, रेडक्रॉस, साल्वेशन आर्मी यातूनच उदयास आली. अनेक स्वयंसेवी संघटनांची जगातील विविध देशात स्थापना झाली. १३५१ साली अंमलात आलेल्या ब्रिटनच्या ‘पुअर लॉ'ची द्वितीय त्रिशताब्दी सन १९५१ ला जगभर साजरी झाली. त्यानिमित्ताने हेन्री व्हिकार्डी यांनी अमेरिकेत एका स्वयंसेवी

वंचित विकास जग आणि आपण/५६