पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

इतरेजनांपेक्षा वेगळे मानण्याची आपली मनोभूमिका जोवर बदलणार नाही तोवर मतिमंदांच्या लैंगिकतेचा प्रश्न मूलतः सुटू शकणार नाही, असे मला

वाटते.
 मतिमंदांच्या लैंगिकतेसंबंधी प्रचलित समाजदृष्टी बदलण्यासाठी विविध अंगांनी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मतिमंदांना लैंगिक साक्षर करायला हवे. त्यांच्या पालक व शिक्षकात याबाबतच्या विशेष प्रशिक्षणावर जोर द्यायला हवा. मतिमंदांच्या विवाहास प्रोत्साहन द्यायला हवे. काही प्रमाणात सहजीवनास (कंपॅनिअनशीप) पूरक समाज मन तयार करायला हवे. मतिमंदांच्या लैंगिक हक्कांबद्दल समाजात जागर घडून आणायला हवा. गर्भनिरोधक साधनांच्या वापराबाबत उदारपण विकसित व्हायला हवे. अशा बहविध प्रयत्नांतूनही मतिमंदांच्या लैंगिकतेचा यक्षप्रश्न सुटण्यास, आवश्यक उदार समाजदृष्टी विकसित होण्यास मदत होईल. मतिमंदांचे सामान्यीकरण हे आपल्या सर्व प्रयत्नांचे उद्दिष्ट असायला हवे. सैद्धांतिकतेपेक्षा व्यवहारवाद, नैतिकतेपेक्षा सहजता यासारखे प्राधान्यक्रमच मतिमंदांना माणूस म्हणून जगण्यास उपकारक ठरतील. हेच तर आपणास करायचंय ना?

वंचित विकास जग आणि आपण/५५