पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/592

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रेॉ० मॅक्सम्यूलर यांचा मृत्यु.

५७५

तीस जर्मनी व फ्रान्स यांतील मोठमोठ्या युनिव्हर्सिटींतून प्राच्यभाषांचे प्राध्यापकांच्या कायमच्या जागा स्थापन झालेल्या आहेत. प्राच्य भाषांतील ग्रंथसमूहापैकीं युरोपांतील विद्वानांवर ज्यांचा विशेष परिणाम झाला ते ग्रंथ भाषाविषयक आणि धर्मविषयक होत; व भाषाविषयक ग्रंथांतही पाणिनीचें व्याकरण पहिला किंवा श्रेष्ठ ग्रंथ होय. सर्व जगाच्या प्राचीन किंवा अर्वाचीन इतिहातील पांच मोठया विद्वानांचीं नावें घ्यावयास सागितलीं तर त्यांत पाणिनीच्या नावाचा समावेश करावा लागेल असें पांचसहा वर्षांपूर्वी अमेरिकेंतील एका विद्वान् गृहस्थानें उद्गार काढलेले आहेत. संस्कृत भाषेचे प्राचीनत्व व विशेषेंकरून कृति, प्रत्यय वगैरे मूळ शब्दांपासून किंवा धातूपासून भिन्न करून त्यांच्यापासून धित शब्द कसे बनवावे याबद्दल भाषेंतील सर्व शब्दांस लागू पडणारे व्यापक नियम व अपवाद यांचा पाणिनीच्या अपूर्व ग्रंथांत जो समावेश केलेला आहे त्यानें तर पाश्चात्य भाषा-विद्वानांच्या उद्योगास एक प्रकारचे नवें वळण लागलें आणि गेल्या ३०/४० वर्षात निरनिराळ्या भाषाचें तुलनादर्शक भाषाशास्त्र म्हणून जर्मन पंडितांनी एक नवीनच शास्त्र निर्माण केलें आहे. हें शास्त्र पूर्णतेस आणण्यास बॉप वगैरे पंडितांनीं पुष्कळ परिश्रम केले आहेत ही गोष्ट खरी आहे; पण पाणिनीचा ग्रंथ याचें मूल आहे हें विसरतां कामा नये. भाषाशास्रावर प्राच्य थसमूहाचा व प्राच्य भाषांच्या अभ्यासाचा हा परिणाम झाला. प्राच्य भाषाच्या अध्ययनाचा दुसरा परिणाम धर्मविषयक होय. बर्नाफ, बॉप, कोलरिज, ोन्स वगैरे प्राच्य भाषाभिज्ञ पाश्चात्य विद्वान् निपजण्यापूर्वी युरोपांतील लोकास आशिया खंडांतील पॅलेस्टाईन प्रांतांत निघालेला एकच काय तो धर्म माहीत होता. मुसलमानी धर्मग्रंथांची ओळख त्यास झालेली होती खरी, पण मुसलमानी धर्मही बायबलांतूनच निघाला असल्यामुळें खिस्तीधर्माहून भिन्न तऱ्हेच्या धर्मकल्पना, धर्मविचार, धर्मतत्त्वें किंवा धर्मग्रंथ त्यांच्या अवलोकनात येत नसत. रोमन आणि ग्रीकलोक याचे पूर्वीचे धर्म किंवा इजिप्तमधील पूर्वीच्या लोकांचा धर्म यांचीच काय ती खिस्ती धर्माशीं तुलना होत असे व कित्येक विद्वानांनीं तर खिस्तधर्माचींच तत्त्वें रोमन लोकांच्या जुन्या धर्मात आहेत असें प्रतिपादन केलेले होतें. पाश्चात्य पंडितांच्या विचाराचा हा ओघ वेद, झेंदास्ता, बौद्धधर्माचीं धर्मसूत्रे किंवा त्रिपिटिका यांच्या अध्ययनानें पालटला आणि या योगानें त्यांच्या विचारसरणींतही पुष्कळ फेर पडून अखेरीस निरनिराळ्या धर्माचे तुलनादर्शक नवीन शास्र निघाले. त्याचप्रमाणें रोमन आणि ग्रीक लोकांच्या जुन्या धर्मांतून देवतांच्या वगैरे ज्या कथा आहेत त्यांची आणि ऋग्वेदांतील कथांची, व ग्रीक, रोमन, संस्कृत वगैरे भाषांची तुलना करण्यांत आली. तेव्हां देवता-विषयक या सर्व कथांचे बीज प्राच्य ग्रंथात आहे व युरोपांतील नव्याजुन्या भाषा व जुन्या धर्मांतील कथा यांचे सादृश्य मनांत आणलें असतां

७२