पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/591

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७४
लो० टिळकांचे केसरीतील लेख.

अमूल्य विद्वद्रत्न हरपलें असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. 'स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते' असें जें आम्हीं या लेखाच्या आरंभी लिहिलें आहे त्याची सत्यता नजरेस येण्यास प्रो. मॅक्सम्यूलर यांचे चरित्र हें एक उत्तम साधन होय. हें जात्या जर्मन असून यांचा जन्म व पूर्वाभ्यास जर्मनीत झाला व पुढे कांहीं दिवस प्रसिद्ध विद्वान् बर्नाफ यांच्या हाताखालीं अभ्यास करण्याकरितां हे पारीस शहरांत गेले. हे ज्या वेळीं पारीस शहरांत अभ्यासाकरितां गेले तो काल असा काहीं चमत्कारिक होता कीं, तेव्हां युरोपांतील विद्यापीठातून आशिया खंडातील व विशेषेकरून संस्कृत, झेंड, पाली वगैरे भाषातून जो धर्मग्रंथांचा संग्रह आहे त्याचा नव्या पद्धतीनें आस्थापूर्वक अभ्यास करण्याइतका तो महत्त्वाचा आहे, व त्याकामी काहीं बुद्धिवान् पुरुषांनी आजन्म परिश्रम केले असता त्यापासून पाश्चात्य राष्ट्राचे पुष्कळ हित होण्याचा संभव आहे अशी तिकडील विद्वानांची खात्री होत चालली होती. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड वगैरे देशातील युनिव्हर्सिटींतून या कालापूर्वी जें शिक्षण मिळत असे ते प्राय: ग्रीक व रोमन लोकातील प्रसिद्ध विद्वान्, तत्त्वज्ञानी किंवा मुत्सद्दी यांच्या ग्रंथाच्या अभ्यासानेंच प्राप्त होई. साराश, संस्कृत आणि इतर प्राच्य भाषा यांतील ग्रंथभाडाराची अथवा तत्त्वविचाराची किल्ली जेव्हा पहिल्याने पाश्चात्य विद्वानांस सापडली तेव्हा तिचा परिणाम पुष्कळ अंशी ग्रीक व रोमन लोकांचे विद्याभाडार जेव्हां पहिल्यानें लुटलें गेलें त्या वेळच्याप्रमाणेच झाला, ही गोष्ट आता निर्विवाद सिद्ध झालेली आहे. प्राच्य भाषांत, प्राच्य धर्मात अथवा प्राच्य ग्रंथसमूहात पाश्चात्य विद्वानाच्या तीव्र बुद्धीस योग्य असे विचार, माहिती किंवा तत्त्वज्ञान सापडणे अशक्य अशी पुष्कळाची पहिल्यानें समजूत होती, व पहिल्या पहिल्याने कित्येक पंडितानी तर ग्रीक व रोमन लोकाचे ग्रंथ चोरून नेऊन हिंदुस्थानातील पंडितांनी आपल्या स्वत:च्या नांवावर खोटेच बनावट ग्रंथ रचलेले आहेत व त्यांत जर कांहीं ग्राह्याश असला तर तो ग्रीक लोकांपासून चोरलेला आहे असा आक्षेप घेऊन प्राच्य भाषेचा अभ्यास करणारांची थट्टाही करण्यास मागेंपुढें पाहिले नव्हतें. आलेक्झांड्रिया येथील लायब्ररी खलिपानें जाळली, तेव्हां त्यानें अशाच प्रकारचे उद्गार काढल्याचे प्रसिद्ध आहे. लायब्ररींतील ग्रंथांत जर कांहीं ज्ञान असेल तर तें मुसलमानी धर्मातून घेतलेले आहे, सबब द्विरुक्त म्हणून निरुपयोगी आहे; आणि ज्ञान नसेल तर ते ग्रंथच ठेवण्यालायक नाहीत, अशी कोटी लढवून खलिपाने हा मोठा ग्रंथसमूह जाळण्यास परवानगी दिली अशी गोष्ट इतिहासात नमूद आहे. ही गोष्ट खरी असो व खोटी असो, प्राच्य भाषेतील ग्रंथसमूहास हा न्याय लावण्याचा कित्येक पाश्चात्य पंडितांनीं प्रयत्न केला असताही त्यांस यश न येतां शेवटीं पुष्कळ विद्वान्, बुद्धिवान्, शोधक आणि विद्याव्यासंगी फ्रेंच व जर्मन पंडितांच्या लेखांनीं, शोधानी आणि उद्योगानें प्राच्य ग्रंथांची योग्यता व महत्त्व युरोपांतील सर्व विद्यापीठांतल्या विद्वानांस कबूल होऊन अखेरीस आज