पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/593

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७६
लो० टिळकांचे केसरींतील लेख

युरोप आणि आशिया या दोन खंडांत सुधारलेले म्हणून जे लोक आहेत किंवा होते ते सर्व मूळ एका मानवी शाखेचे व एक भाषा बोलणारे असावे असा विचार जागृत होऊन तो उत्तरोत्तर दृढावत गेला, आणि अखेरीस आर्यधर्माचीं व आर्यभाषेचीं मूलतत्त्वें प्राच्य ग्रंथांत आणि प्राच्य भाषांत आहेत ही गोष्ट सर्व मान्य झाली. किंबहुना आर्यलोकांचा प्राचीन धर्म, रीतिभाति, आचारविचार किंवा कल्पना यांचे प्राच्य भाषांतील ग्रंथ हें एक भांडारच आहे, व युरोप आणि आशिया खंडांत ज्या आर्य शाखेच्या लोकांनी आपलें वर्चस्व स्थापित केलें होतें किंवा आहे ते मूळचे एके ठिकाणीं राहणारे होते ही कल्पना प्राच्य भाषेच्या अभ्यासानेंच उदयास येऊन दृढ झाली आहे. प्रो.मॅक्सम्यूलर यांच्या उद्योगाचें विद्वत्तेचे आणि ग्रंथांचे खरें महत्त्व लक्षांत येण्यास वर सांगितलेली हकीकत पूर्णपणें ध्यानांत ठेविली पाहिजे. प्रो.मॅक्समूलर यांचा जन्म सन १८२३ सालीं झाला व आपल्या वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजे सन १८४५ सालीं ते बर्नाफनामक प्रसिद्ध व बुद्धिमान् गुरूंचीं व्याख्यानें ऐकण्यास पॅरीसमध्यें गेले. एखाद्या ठिकाणीं एखादा प्रसिद्ध विद्वान् गुरू असल्यास बुद्धिवान् विद्यार्थ्याची तिकडे कशी ओढ लागते याचा परिचय दुर्दैवाने अलिकडे आपणास मिळत नाहींसा झाला आहे. पण युरोपांतील युनिव्हर्सिटींतून अशीं उदाहरणें पुष्कळ पाहण्यांत येतात, प्राच्य भाषा व प्राच्य ग्रंथ यांचा त्या वेळीं नुकतांच युरोपांत प्रवेश होत होता. अर्थात् तेव्हांपासून १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत प्राच्य भाषेच्या व प्राच्य धर्माच्या ज्ञानाचा युरोपांत जो प्रसार झाला,जी महती वाढली ती सर्व प्रो.मॅक्सम्यूलर यांच्या डोळ्यादेखत वाढली, इतकेंच नव्हे तर ती वाढविण्याच्या कामीं ज्यांनीं अश्रांत मेहनत घेतली त्यांपैकीं प्रो. मॅक्सम्यूलर हे एक प्रमुख विद्वान् होते एवढे म्हटलें म्हणजे यांच्या उद्योगाचे आणि विद्याव्यासंगाचे खरें स्वरूप वाचकांच्या नजरेस येईल. मॅक्सम्यूलरसाहेबांनीं युरोपांतील विद्यापीठांतल्या विद्वानांच्या विचारसरणींत झालेला हा फरक आपल्या डोळ्यांनीं पाहिलेला आहे,किंबहुना त्यांच्या हयातींत तो झालेला आहे, आणि या विचारक्रांतीचा इतिहास जेव्हां लिहिण्यांत येईल, तेव्हां त्याचबरोबर प्रो. मॅक्सम्यूलर यांचे नांवही नेहमीं जोडलेले राहील यांत शंका नाहीं.

 परंतु प्रो.मॅक्सम्यूलरसाहेबांची आज जी सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे व त्यांच्याबद्दल पृथ्वींतील सर्व देशांतील विद्यापीठांतून जी पूज्यबुद्धि आहे तिंचे वर सांगितलेल्या हकीकतीपेक्षांही दुसरें एक कारण आहे. प्राच्य भाषा, प्राच्य ग्रंथ, प्राच्य धर्मतत्वें, प्राच्य विचार यांची जी लाट युरोपांत उसळली, व त्यामुळें जी