पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/513

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. पडली असती; इतकेंच नव्हे तर महाराष्ट्र देशांतील लोकांचे हातून जी कामगिरी त्यानीं करून घेतली ती त्यांस करून घेतां आली नसती. श्रीशिवाजीमहाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय असे म्हणण्यास हरकत नाहीं. मराठी भाषेची व्याप्ती वाढण्यास या पूर्वी धर्म हें एकच कारण होर्ते; त्यास आतां राजसतेची जोड मिळाली. इंग्रजी भाषा इतर पाश्चात्य भाषांपेक्षा जी श्रेष्ठ झाली आहे तिला इंग्रजी साम्राज्य हें एक प्रबळ कारण होय. कोणतीही विशिष्ट भाषा बोलणारे लोक राज्यकर्ते झाले म्हणजे त्याच्याबरोबरच त्यांच्या भाषेचाही अधिक गैरव होत असतो. आणि असा गौरव झाला म्हणजे पहिल्याने जरी ती भाषा लेचीपेची असली, तरी कालांतरानें तिला प्रगल्भ स्वरूप प्राप्त हेोर्ते. मराठी भाषेला ही स्थिति काही दिवस प्राप्त झाली होती. श्रीशिवाजीमहाराजाचे मराठी साम्राज्य स्थापण्याकरितां झालेले पहिले प्रयत्न सह्याद्रींतील किंल्ले आणि सह्याद्रीला लागून असणारे सुपें, पुणे वगैरे प्रात यांतच करावे लागल्यामुळे मराठी भाषेचे पूर्वीचे केंद्रस्थान बदलून ते सह्याद्रीच्या लगत ध्यावें लागले. तथापि लवकरच या नव्या केद्रापासून महाराष्ट्र भाषेचे किरण मराठयाच्या भाल्याबरोबर उत्तरेकडे अटकेपर्यंत तर दक्षिणेकडे तंजावरपार्यंत जाऊन पोचले. यानंतरचा म्हणजे पेशवाईचा काळ तर मराठी भाषेस जास्तच अनुकूल झाला. शिंदे, गायकवाड आणि होळकर यांनीं ग्वालेर, गुजराथ आणि माळवा या प्रांतांत आपल्या संस्थानाबरोबरच मराठी भाषेची स्थापना केली; आणि पूर्वेकडे नागपुरास भोसल्यांनी तिची बाजू राखली. बेळगाव, धारवाड, म्हैसूर, तंजावर हीं या पूर्वीच सर झालेलीं होतीं. आणि निजामचे राज्य दक्षिणेत कायम राहिलें होते, तरी संतमंडळींनीं औरंगाबाद वगैरे प्रातांतून मराठी भाषेची जी एकदां छाप बसविलेली होती ती मराठयांच्या पराक्रमानें पुढे कायम राहिली. साराश, निजामापासून त्याच्या वसुलाचीच चौथाई आम्ही घेतली एवढेच नव्हे तर चौथाईपेक्षां अधिक मुलुख महाराष्ट्र भाषेच्या टापूखालीं ठेवण्यास तत्कालीन मराठयाचे शौर्य कारण झाले. तात्पर्य, आमच्या संतमंडळीचे ग्रंथ हे आतां केवळ मर्यादित महाराष्ट्राचेच वाङ्मय न राहतां त्याची व्याप्ति मराठी राज्याइतकीच वाढत जाऊन तिनें हिंदुस्थानचा तृतीयांश तरी व्यापला गेला. वाङ्मयास धर्माच्या खेालींत कौडून ठेवण्याचेही आतां कारण नव्हते. ज्या महाराष्ट्र वीरांनीं मुसलमानीतील धर्मच्छल आपल्या कर्तबगारीनें नाहींसा केला, त्याचे पोवाडे गाण्यास किंवा त्यांच्या बखरी लिहिण्यास आतां नवे कवी व लेखक पुढे आले. आणि त्यांना आपली कवित्वशक्ती केवळ धार्मिक विषयांतच खर्च करण्याचे कारण राहिलें नाहीं. मराठी भाषेतील ऐतिहासिक गद्य व पद्य लेख याच वेळेस जन्मास आले व पोसले गेले, याचे कारण वरील विवेचनावरून वाचकांच्या चांगलें लक्षांत येईल. राष्ट्र वाढू लागते म्हणजे तें कांहीं एकाच बाजूनें वाढत नाहीं; आणि राजसत्ता ज्यांच्या हातांत असते, त्यांचे आचारविचारच नव्हे, तर त्यांची भाषाही लेोकांस गोड वाटू लागते.