Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/463

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४४८

लो० टिळकांचे केसरीतील लेख.

भीष्मास धाक दाखविण्याचा जेव्हां प्रयत्न केला, तेव्हा भीष्मांनीं परशरामास असा खडखडीत जबाब दिला आहे कीं, " न जातवान् तदा भीष्मः तृणेषु ज्वलितं त्वया । यावरून महाभारतांतील संभाषणाचे भागांत स्पष्टोक्तीचा गुण अधिक व्यक्त होतो, व समयविशेषीं त्यांतील पात्रे आपल्याहून वयाने किंवा मानाने श्रेष्ठ अशा मनुष्यास खणखणीत जबाब देण्यास मागें पुढे पाहत नाहींत असें जें रा. वैद्य यांनीं म्हटलें आहे, तें किती यथार्थ आहे हे वाचकाच्या लक्षात येईल. महा- भारतातील द्रौपदी, कुती वगैरे स्त्रियाचे वर्तनही अशाच प्रकारे अत्यंत शुद्ध आणि उदात्त वर्णिलेले आहे. द्रौपदीने युधिष्ठिरास अनेक वेळा सणसणीत उपदेश केला आहे, व किरातार्जुनीयाच्या तिसऱ्या सर्गात ' जुहुधीह पावकं ' असें द्रौपदीच्या तोंडात कवीनें वाक्य घातलेले आहे. पाडवाच्या अगी काही अवगुण नव्हते असें नाहीं. त्यानीं द्यूत खेळावयास जावयाचे नव्हते, किवा द्यूतात लावलेले पण द्रौपदी वस्त्रहरणाची वेळ येईपर्यंत पाळावयाचे नव्हते, असे कित्येकाचे त्याजवर आक्षेप आहेत तसेच भीम-- द्रोणानी द्रौपदी वस्त्रहरण चालले असता 'अर्थस्य पुरुषो दासः' असे म्हणून स्वस्थ बसणेही योग्य नव्हतें, असेंही काहींकाचे म्हणणे आहे. पण आमच्या मतें अशा प्रकारच्या कमीपणानें काव्यातील प्रधान पुरुषाच्या स्वभाववैचित्र्याची शोभा न जाता ती अधिक खुलते. सर्वाशी निर्दोष अमा जर काव्याचा नायक कल्पिला तर तो देवच होतो; आणि त्याच्या चरित्रापासून लोकांमध्ये महाकाव्याच्या लक्षणात सांगितलेले जे ' शीलचरित्रवर्धन ' ते होत नाही. युधिष्ठिरादिक पात्रे कितीही तेजस्वी, अभिमानी, दृढनिश्चयी किंवा नीति- मान असली, तरी एकंदरीत ती आमच्यापैकींच आहेत अशी भावना वाचकांच्या मनात असल्याखेरीज महाकाव्यात वर्णिलेले त्याचें चरित्र वाचकास जितके मोहक, बोधप्रद, आनंदकारक आणि अनुकरणीय वाटावे तितके वाटत नाहीं. भीमाचा उद्दामपणा, अर्जुनाचे कौशल्य, युधिष्ठिराची धर्मभीरुता, स्त्रीस्वभावास अनुसरून द्रौपदीचे अगांत असलेली नीतिमत्ता, धैर्य आणि ऐहिक वैभव भोग- ण्याची इच्छा, श्रीकृष्णाची कर्तबगारी, दुर्योधनाचा दुरभिमान किंवा कर्णाचें शौर्य आणि असूया ही जी आज दोन अडीच हजार वर्षे भरतवर्षातील आबाल- वृद्धांच्या तोंडी बसून जाऊन त्यांच्या लोकयात्राक्रमास आधारभूत होऊन राहिलीं आहेत, त्यांतील बीज हेंच होय, पांडव धीरोदात्त व शूर असतील वा नसतील. बिल्हणाने म्हटल्याप्रमाणे त्याचे यश रामाप्रमाणे आज चोहोंकडे विस्तृत होण्यास आणि दुर्योधनाचे रावणाप्रमाणे संकुचित होण्यास व्यासाचेच महाकाव्य कारणीभूत झाले आहे. कवीच्या अनुग्रहाखेरीज मोठमोठ्या राजाचीही आठवण कशी नष्ट होते, याचे कल्हणाने "स्मृतिमपि न ते याति श्रमापा विना यदनुग्रह | प्रकृतिमहते कुर्म- स्तस्मै नमः कवि कर्मणे ॥ " असें जें वर्णन केले आहे तें अगदीं यथार्थ आहे. महाकाव्यातील प्रधान पात्रें ऐतिहासिक असावीत, अर्थात् तीं मोठ्या कुळांतील व वैभवशील असली तरी व्यवहारातील असावी, असे जे आर्ष महाकाव्याच्या