पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पत्रकत्र्याच्या स्फुट सूचना १२३ रावब० चिंतामणराव वैद्य यांचे पत्र गेल्या अंकांत छापून प्रसिद्ध केलेच आहे. त्यावरून त्यांचा व आमचा अबलोन्नतिलेखमालेच्या तिसच्या अकासंबंधानें किती व कोठे मतभेद आहे हें वाचकांच्या लक्षात येईलच. बालविवाहापासून राष्ट्राचे व लोकांचे नुकसान होत नाहीं असें आम्हीं कोठेही प्रतिपादन केले नाहीं. बालविवाह हा अवनतीस थोडाबहुत तरी कारण आहे ही गोष्ट निर्विवाद आहे; परंतु त्याचप्रमाणें फक्त बालविवाह बंद केल्यानैच राष्ट्राची उन्नति होऊ शकणार नाहीं अशी ऐरिश लोक प्रत्यक्ष साक्ष देत आहेत. एवढाच काय तो आमच्या लिहिण्याचा आशय होता. राव ब. चिंतामणराव वैद्य याच्या मताप्रमा णेंच पुष्कळ अंशीं आमची मर्ते आहेत ही गोष्ट आम्हीं प्रथमत:च वाचकांस कळविली होती. तथापि हल्लींच्या लेखांत एकदोन गोष्टी विलक्षण दिसल्यामुळे त्यांचा आम्हीं प्रांजलपणें उल्लेख केला होता. * व्रतानाम् उत्तमं ब्रतम् ’ हा शेरा ज्याप्रमाणे सर्व व्रतांत आढळतो तसाच काही अंशीं या लेखाचा प्रकार झाला आहे. त्याबद्दल विशेष विवरण करण्याची जरूरी नाहीं. हुएनसागनें बालविवाहाचा उल्लेख केला नाहीं या गोष्टीस किती महत्त्व द्यावें याविषयी मतभेद कायम राहील असें आम्हांस वाटतें. मनु, पराशर, महाभारत हे ग्रंथ निःसंशय पूर्वीचे आहेत व त्यांत बालविवाह आढळतो तर या ग्रंथांचा ऐतिहासिकरीत्या उपयोग करणें उचित नाहीं एवढ्याच कोटिक्रमानें आमचे समाधान होत नाहीं. अर्वाचीन पद्धतीवर लिहिलेले ग्रंथ अगर प्रवास वर्णने हींच जर इतिहासाचे आधार असतील तर आमच्या म्हणण्यास ऐतिहासिक काहीं आधार नाहीं हें आम्ही कबूल करतों; पण सूत्रस्मृतिग्रंथ जर ऐतिहासिक प्रमाणात ग्राह्य मानले तर आमच्या म्हणण्यास पुष्कळ आधार आहेत. सिलीसाहेबांनीं इंग्लंडच्या राज्य प्रसारावर जेो एक ग्रंथ लिहिला आहे त्यांत हिंदू लोकांच्या अशक्ततपेक्षा त्यांमधील फूटच त्यास त्यांच्या पारतंत्र्यास जास्त कारणीभूत झाली असे स्पष्ट दाखविले आहे. इताली देशास पारतंत्र्य येण्यासही हेंच कारण झालें असा खुद्द बोनापार्ट याचा लेख आहे. तात्पर्य, आमच्या पारतंत्र्याचा दोष बालविवाहावर टाकणें योग्य होणार नाहीं. बालविवाह घातुक असून ते बंद झाले पाहिजेत ही गोष्ट आम्हांस संमत आहे व त्याकरितां रावब. वैद्य जी खटपट करीत आहेत त्यांचे आम्ही मनोभार्वेकरून अभिनंदन करतों. आमचे म्हणणें इतकेंच कीं, इष्ट हेतु साध्य होण्यास दुसरी महत्त्वाचीं अनेक अंगें व उपांगें लागतात. तीं सिद्ध करून जागृत ठेवणें हें प्रत्येक देशहितचिंतकाचे पहिलें काम आहे. बालविवाह बंद करणें ही त्यापैकींच एक गोष्ट आहे, परंतु इतर अंगाबरोबर तिचा विचार झाला असतां ती हल्लीं पेक्षांही विशेष सुलभ रीतीनें अमलांत येईल.