पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ लो ० टिळकांचे केसरींतील लेख आपला धर्म* हल्लीचा कालच असा विचित्र आला आहे कीं, सुबंधूनें म्हटल्याप्रमाणे आपल्या डोळ्याचे महत्त्व लक्षांत येण्यास आशांची जरूर लागते. आमचे राज्य गेलें, आमची संपत्ति गेली, आमचे स्वातंत्र्य गेलें यामुळे आतां आम्हांस असें वाटू लागले आहे कीं, आम्हीचसे काय पण आमचे पूर्वजही मूर्ख व अज्ञानी होते. राज्यव्यवस्था कशी ठेवावी, लष्करी खातें कसे वाढवावें प्रजेस गोड अभिवचनें देऊन त्याच्या जीवित्वाची सर्व किल्ली आपण आपल्या हातांत कशी राखावी इत्यादि गोष्टी आमच्या पूर्वजास ठाऊक नव्हत्याच; पण त्याचबरोबर धर्माची व ईश्वराचीही त्यास पुरी ओळख झाली नव्हती. परराज्याच्या चक्रामुळे ज्यांच्या आशा इत झाल्या आहेत त्यांच्या मुखांतून असे उद्गार निघणे साहजिकच आहे. ** कालो वा कारण प्राज्ञ: । राजा वा काल कारणम् । इति ते संशयी माभूत् । राजा कालस्य कारणम् ॥ ” असा एक जुना छेोक आहे ती पुष्कळ अंशी यथार्थ आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते, जे जगामध्यें मान्यतस व अधिकारास चढलेले असतात त्याचेच आचारविचार लोकांस ग्राह्य वाटतात व तसे आपले आचारविचार झाल्याखेरीज आपणांस त्यांची पदवी प्राप्त होणार नाहीं असा स्वभावत:च समज होतो. धर्मासेबंधानें स्थितिही अशाच प्रकारची आहे. पाश्चिमात्य विद्येची ज्या वेळेस आमच्याकडे पहिल्यानें सुरवात झाली त्या वेळेस पाश्चिमात्यांचे शास्रीय ज्ञान व पद्धति पाहून काहीं मंडळी इतकी दिपून गेली होती कीं, घटपटादिकाची व्यर्थ खटपट अगर द्वैताद्वैतादि काथ्याकूट त्यांस नीरस वाटून त्यांनीं एकदम पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाकडे धांव घेतली. आमचा खरा धर्म केोणता आहे, जीवेश्वराचा काय संबंध आहे, ह्या विषयावर आपणांमध्यें कोणते ग्रंथ आहेत, त्यात कसा काय विचार केला आहे, या विचाराचा व बाह्य आचाराचा कितपत संबंध अगर कार्यकारण भाव आहे इत्यादि गोष्टींचा विचार न करिता निरीश्वर देवाच्या आधुनिक प्राथैनेस भुलून या मंडळींनीं नानापंथ काढले व त्याचा यथाशक्ति प्रसार करण्याचाही प्रयत्न केला; परंतु ही प्रवृत्ति लवकरच कुंठित झाली. ज्ञान, कर्म व भक्ति याचा आमच्या ग्रंथकारांनी केलेला ऊहापोह जरी या मंडळीस पसंत नव्हता तरी सदर ग्रंथांचे अध्ययन केलेल्या युरोपियन लोकांचे लेख आमच्या मंडळीच्या डोळ्यांत अंजन घालण्यास कारणीभूत झाले. म्याक्समुलरादिकरून संस्कृतज्ञ इग्रजांचे लेख व थिआसॉफिकल सोसायटीसारख्या संस्था यांनी हिंदुधर्माच्या उज्ज्वल तत्त्वास पुनरपि तेजी आणली. आपल्या ऋषींचे आत्मानात्म विचार व योग्यांचीं प्राणायामादि साधनें हीं अगदीं शुष्क व वायफळ आहेत असा जो समज होता तो पालटू लागला. तत्त्वविचाराचे कांहीं सिद्धांत दृश्य शास्त्राच्या आटोक्याबाहेरचे आहेत असें कळून आले आणि

  • (केसरी-तारीख २३ फेब्रुवारी १८९२ ).