पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फीमेल-हायस्कुलांतील शिक्षणक्रम. ७५

आहे, अशा स्त्रियांच्या मात्र उपयोगी पडणार. मध्यम स्थितीच्या गृहस्थास त्या शाळेपासून कांहीएक उपयोग होणार नाहीं; इतकेंच नव्हे, तर उलट उपद्रवमात्र होईल. आतां कित्येकांचे असें म्हणणे पडेल की, प्रौढविवाहादि चाली आपल्यास जर प्रचारांत आणावयाच्या आहेत,तर स्त्रियास आग्लभौम शिक्षण दिल्यानें त्या कामास मदत होईल. परंतु हा समज अगदीं अविचाराचा आहे. जेव्हा कोणत्या एखाद्या कामांत सुधारणा कर्तव्य आहे, तेव्हा पुर्वीच्या स्थितीस सोडून फारसें पुढें गेलें तर काय परिणाम होतो, याची साक्ष प्रार्थनासमाज देतच आहे, व स्त्रीहायस्कुलचीही थोडीबहुत तीच स्थिति आहे. आजच्या स्थितीस लोकांस रूचेल त्याप्रकारचें स्त्रीशिक्षण प्रथमत: सुरू करा, हळूहळू त्यात समाजाच्या कलाप्रमाणें सुधारणा केल्या म्हणजे इष्टहेतु सिद्धीस जाईल. नाहींतर वर सागितलेल्या एकदोन वर्गाखेरीज तुमच्या हायस्कुलाकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाहीं व समाजसुधारणा एकीकडेच राहून तुम्ही मात्र आपणास समाजापासून तोडून घ्याल.

-----
फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम*
(नंबर ३)

कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती करण्याचा उद्देश काय व तो सिद्ध होण्यास कोणत्या उपायांची योजना करावी याचा पुरता विचार होऊन मग त्या गोष्टीस सुरूवात होत असते. फीमेल हायस्कुलाच्या उत्पादकांनींही याचा नीट विचार करूनच या हायस्कुलाची उभारणी केली असावी. पण त्या हायस्कुलापासून लोकांस होणा-या उपयोगाबद्दल ज्याअर्थी आज बराच मतभेद पडला आहे, त्याअर्थी सदर उद्देशांचा व साधनाचा पुन: एकवार विचार करणें जरूर आहे. तशात हें हायस्कूल जेव्हां स्थापन झालें तेव्हा स्त्रियांस शिक्षणच नको असें म्हणणारे बरेच लोक असल्यामुळे स्त्रीशिक्षणाच्या आवश्यकतेबद्दलच वाद झाला. त्याच्या साधनवैचित्र्यामुळें उत्पन्न होणा-या मतभेदाची त्या वेळेस फारशी चर्चा झाली नव्हती. पण एकदां हायस्कूल स्थापन झाल्यावर जो मतभेद पहिल्यानें महत्वाचा नव्हता त्यास आपोआपच महत्त्व आलें, व एवढ्या प्रयत्नाने स्थापन केलेल्या प्रतिवर्षी खासगी व सरकारी मिळून इतके पुष्कळ रुपये ज्यासाठी खर्च होतात त्या शाळेचा खरोखर लोकांस कितपत उपयोग होतो असा प्रश्न स्वभवत:च उत्पन्न झाला. नवीन म्हनून कांहीं दिवस कोणी बोललें नाहीं; माहितीच्या दुर्मिळतेमुळें कांहीं स्वस्थ बसले. पण ही दोनही कारणें चिरकालिक नसल्यामुळें, हळूंहळूं या विषयाची चर्चा जास्तच होत चालली, व त्या मानाने आपल्या


  • (ता. ११ आक्टोबर १८८७)