पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० लो. टिळकांचे केसरींतील लेख

अनुसरून पहिल्यनेंच कायम केला असता, तर आजमितीस या हायस्कुलाच्या हितचिंतकांची संख्या ब-याचपटीनें वाढली असती. पण आमच्या देशांत कित्येक जातींत ज्याप्रमाणें स्त्रियांस गोषा आहे, त्याप्रमाणे स्त्रियाच्या संबंधाचीं सर्व कृत्येही गोषातच झालीं पाहिजेत अशा समजुतीनेंच कीं काय हें हायस्कूल त्याच्या उत्पादकांनीं जबर गोषात घालून ठेविलें आहे, व या शाळेसंबंधानें जे गैरसमज लोकात झाले आहेत त्यपैकीं कांहींस वरील गोषाच कारण झाला आहे. लोकास काय पाहिजे आहे हें नेहमीं लक्षांत ठेवून जर शाळेचे उत्पादक आपलें वर्तन ठेवतील, लोकांस विचारतील, त्यांची संमति घेतील, त्यांस ज्या गोष्टी नको आहेत त्या काढून टाकतील, तर स्त्रीशिक्षणाचे कामांत त्यांस लवकर यश येईल. पण गोषात राहून समाजाच्यापुढें एक शतक धांवणा-यांच्या हातून काहींएक व्हावयाचें नाहीं. अस्तु. शाळेच्या उत्पादकानी प्रथमत:च शाळेच्या डोक्यावरील पाघरूण काढण्याचा जो हा अर्धवट प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्याचे आभार मानून त्यांनी सांगितलेला शिक्षणक्रम आमच्या मतें असल्या शाळेस कितपत योग्य आहे याचा विचार करूं. सूक्ष्मरीतीनें विषयावलोकनाचे ज्यांस शिक्षण मिळाले नही, व ज्यांचे वर्तन कोणत्या तरी एखाद्या मुख्य ग्रहावर सदोदित अवलंबून असणार अशा काहीं अजागळ उपग्रहांकरिता, -- आणि वर लिहिल्याप्रमाणें आपल्या मताविरुद्ध जे लिहितात व बोलतात ते सर्व असंस्कृत व अविचारी अशा दुराभिमानानें ज्याचीं अंत:करणें भरून जाऊन ज्याच्या दृष्टीवर तज्जन्य तिमिरता आली आहे अशांकरिता, --प्रथमत: येथें ही एक गोष्ट सागितली पाहिजे कीं, या हायस्कुलाची संस्थापना झाल्या दिवसापासून व तत्पूर्वीही स्त्रीशिक्षणाच्या आवश्यकतेबद्दल आम्ही अनेक वेळा लिहिलें आहे. स्त्रीशिक्षण ज्यांस खरोखरच अवश्य वाटते आहे असे आज पुष्कळ लोक आहेत. परंतु तें शिक्षण आपल्य समाजाची सद्य:स्थिति मनांत आणिता कोणत्या त-हेचें असावें याविषयी मात्र बराच मतभेद आहे; व तो मतभेद बहुत महत्त्वाचा असल्यामुळें या हायस्कुलासंबंधानेंच आज दोन पक्ष झाल्यासारखे आहेत. फीमेल हायस्कुलाच्या उत्पादकामध्यें व बाहेरील टीकाकार वर्गामध्ये जो भेद आहे तो वरील प्रकारचाच होय. स्त्रीशिक्षण दोघासही हवें आहे पण त्यांचे मार्ग भिन्न भिन्न असल्यामुळें दोघांत भेद आला आहे. आतां कित्येक लोकांचे असें म्हणणें आहे कीं, मुख्य उद्देशाबद्दल ऐक्य असता मार्गवैचित्र्यामुळें अशा त-हेनें एकच उद्देश असणा-या लोकांमध्यें फूट पडूं नये; व प्रथमत: हें म्हणणें मोठें सयुक्तिक आहेसें वाटतें. पण जगामधील सामाजिक, राजकीय किंवा धर्मसंबंधीं जे आजपर्यंत अनेक पक्ष होऊन गेले किंवा झाले आहेत त्यांची, वरीत तत्त्व मनांत आणून जर विचार केला तर, "ऋजुकुटिल नानपथजुषां नृणां एको गम्य: त्वमसि पयसामर्णव इव" अशीच स्थिती आपल्या नजरेस येईल. शिवाय कित्येक गोष्टी अशा असतात कीं, सामान्य त-हेनें त्यांची