पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम ७१

व्याख्या देतां येत नसून त्या एका विशिष्ट त-हेनें होतील तरच त्या मान्य होतात. स्त्रीशिक्षणाचा प्रकार आमच्या मतें ह्यांतीलच आहे. ज्याप्रमाणें समाजाची एकंदर व्यवस्था लागणें हेंच राज्यव्यवस्थेचें कर्तव्य असतां राजसत्ताक, प्रजासत्तक वगैरे एकच उद्देश साधण्याचे अनेक भिन्न मार्ग आहेत, ज्याप्रमाणे एकच ईश्वर प्रतिपाद्य असतां कित्येकांच्या मताप्रमाणें कानीन प्रभूवर विश्वास ठेविल्याखेरीज तो प्राप्तच होत नाहीं, तद्वत् च काहीं अंशी सामाजिक सुधारणांची स्थिति आहे. देशकालनुरोधाने कोठें कोणती सुधारणा कितपत हितकारक होईल ह्याबद्दल नेहमीं मतभेद रहावयाचाच; व जोंपर्यंत प्रत्येक व्यक्ति किंवा व्यक्तिसमूह आपापल्या मताचा अभिमान बाळगून दुस-यांची मतें तिरस्कार्य समजतात तोंपर्यंत दोन्ही पक्षामधील अंतर कधीही कमी व्हावयाचें नाहीं. लोकमत व त्यावर अवलंबून राहणारी नीति, अनीति इत्यादिक सामजिक बंधने हीं कालातरीं व देशातरीं भिन्न भिन्न असतात ही गोष्ट मान्य आहे. तथापि काल्पनिक स्वमताभिमानानें ऊर्ध्वदृष्टि न होता लोकाग्रणींनीं आत्मकालीन देशस्थितीस व लोकमतास अनुसरून सुधारणेचा मार्ग क्रमिला पाहिजे. उदाहरणार्थ, आमच्या स्त्रियांस शिक्षण द्यावें असें जरी पुष्कळांस वाटत असले तरी आपल्या समाजाची स्थिति मनांत आणून तें शिक्षण आपल्याकडे कोणत्या त-हेचें दिलें असता लोकमान्य होईल याचा विचार त्या कामात पडणा-या लोकानी प्रथमत: केला पाहिजे. लोकमत मागे पडलें असल्यास ते सुधारून घेण्याचा उद्योग करा, पण त्यास सोडून जाऊं नका. मनुष्यजातीचें अर्धांग शिक्षित व अर्धांग अशिक्षित राहिल्यास त्या दोघांचा मिलाफ कधीही व्हावयाचा नाहीं, ही गोष्ट सर्वास कबूल आहे; पण तेवढ्यामुळें दुस-या अंगास आज पहिल्याला द्यावयाचे तेंच शिक्षण देऊं म्हटल्यास कोणी ऐकणार नाहीं. स्त्री व पुरूष ह्याचीं कर्तव्यें या जगात भिन्न भिन्न आहेत. व यामुळें कधीही एकाचें शिक्षण दुस-याशीं जुळणार नाही. पण हा परिणामाचा भेद झाला. पण तत्पूर्वीही देशकालानुरोधाने या दोन्ही शिक्षणांत भेद अवश्य केला पाहिजे; व तो जितका आमच्या देशात अवश्य आहे तितका फीमेल हायस्कुलाच्या उत्पादकाच्या हातून केला गेला नाहीं असें आमचें पहिल्यापासून म्हणणें होतें. साराश, त्या हायस्कुलाच्या चालकांमध्यें व आमच्यामध्ये जो भेद आहे तो उद्देशवैचित्र्यानें नव्हे, तर मार्गवैचित्र्यामुळेंच पडला आहे; व नुक्ताच आमच्या बंधूनें जो त्या शाळेंतील शिक्षणक्रम प्रसिद्ध केला आहे त्यावरून तर हा भेद दृढतर होण्यास जास्त कारण झालें आहे. स्त्रियांच्या हायस्कुलांत हल्लीं जें शिक्षण मिळतें त्यात व पुरूषांस जे त्याच्या शाळांतून मिळतें यात फारसा भेद नाही; व जर स्त्री व पुरूष यांची आमच्या समाजातील कर्त्यव्यें मनांत आणिलीं तर असल्या शिक्षणापासून स्त्रियांस (म्हणजे, मुख्यत्वें सुशिक्षित पुरूषवर्ग ज्या स्थितींतील अर्थात् मध्यम वर्गांतल्या स्त्रियांस) विशेष फायदा न होतां, त्यांस तसे शिक्षण जुलुमानें दिल्यास, समाजाचें अहित मात्र होणार आहे.