पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० लो. टिळकांचे केसरींतील लेख

वचनाचा संकोच करण्यास महाभारतांतही आधार आहे. तो कोणता तर आदिपर्वांतील पंडुकुंतीच्या संवादांतील श्वेतकेतूची कथा हा होय. महाभारतांत जागोजाग ज्या अनेक कथा आहेत, त्यांपैकींच ही एक आहे. यांत पंडु कुंतीस असें सांगतो कीं, मनुष्यजातींत विवाहसंस्काराचा नियम प्रथमत: नव्हता व त्या वेळेस हवी ती स्त्री हव्या त्या पुरुषाशी जनावराप्रमाणे यथेच्छ व्यवहार करीत असे -

अनवृता:किल पुरा स्त्रिय: आसन् वरानने
कामचारविहारिण्य: स्वतंत्राश्चारुहासिनी |

म्हणजे पशूंप्रमाणे पूर्वी स्त्रिया अनावर व स्वैर असत. हा त्यांचा पशुवत् स्वैरपणा श्वेतकेतु नामक ऋषीनें:

व्युच्चरन्त्या: पतिं नार्य अद्यप्रभृतिपातकं
भ्रूणहत्यासमं घोरं भविष्यत्यसुखावहं |

जी स्त्री इतउत्तर पतीस सोडून व्यभिचार करील तिला भ्रूणहत्येचें घोर पाप लागेल अशी मर्यादा करून बंद केला. आता रा.ब. काय म्हणतात ते ऐका. "अशा त-हेची (श्वेतकेतूनें बंद केलेली) स्वतंत्रता (ऊर्फ स्वैरपणा) मनुष्य जातींत विवाहसंबंध झाल्यापासून नष्ट झाला इतकाच "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" याचा अर्थ करणें यथार्थ दिसतें !" धन्य रावबहादुराची व त्याच्या अगाध संकृत ज्ञानाची ! टीकाकार तर राहूंद्याच पण प्रत्यक्ष मनूसही ही कल्पना सुचली नसून त्यानें पाचव्या अध्यायांत "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" याचा स्त्रीनें नेहमीं कोणाच्या तरी आज्ञेंत रहावे, स्वतंत्र वागूं नये एवढाच अर्थ केला ! आम्ही रा.ब.स इतकेंच विचारितों कीं हा जो त्यांनीं अपूर्व बादरायणसंबंध जोडिला आहे तत्पूर्वी वर दिलेली वचनें त्यांनीं पाहिलीं होतीं का? असल्यास त्यांनीं "पिता रक्षति कौमारे" वगैरे पूर्वचरणाचा शेवटच्याशीं काय संबंध पाहिला ? भारतांत संबंध कोणता आहे आणि मनूंत कोणता ? अथवा सर्वच जेथें 'अनावर' तेथें पूर्वापारसंबंध तरी कशास पाहिजे? मनूंत स्त्रीयेच्या संबंधानें 'स्वतंत्र' शब्दाचा प्रयोग आहे; महाभारताही आहे. कोशांत ही 'स्वतंत्र' शब्द सापडतो. ख्रिस्ती धर्मशास्त्रात आदामनेंही आपल्या मुलीशी म्हणजे ईव्हशी शरीरसंबंध केला. अतएव रावबहादूर म्हणतात कीं, "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" याचा अर्थ अत्यंच संकोचाचा घ्यावा लागतो. अहो 'जुक्ति:' अहो अकांडपांडित्यप्रकर्ष: ! कोठे महाभारत, कोठें मनू व कोठे आमचे रावबहादुर !

अस्माकं बदरीचक्रं युष्माको बदरीतरू:
बादरायणसंबंध: यूयं यूयं वयं वयं |

. (टीप पुढील पृष्ठावर पहा)