पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर यांचे अपूर्व युक्तिचापल्य

५१


रा. ब. चें दुसरें असें म्हणणें आहे कीं, ज्या विश्वजित् यज्ञांत यजमानानें आपलें सर्वस्व दान करावें असें सांगितलें आहे तेथेंही "देयं दारसुतादृते" स्त्री पुत्र याखेरीज करून असा पत्नी व पुत्र यांबद्दल अपवाद सांगितला आहे. यावरून स्त्रीवर स्वामित्व सर्वांशी पुरुषास प्राप्त होत नाहीं असें सिद्ध होतें. ठीक आहे; पण हे कोटी कांहीं नवी नव्हे. ज्या ग्रंथकारांस ही कोटी मान्य आहे असे ग्रंथकार देखील "न स्त्री स्वातंत्रमर्हति" याचा आम्ही वर लिहिल्याप्रमाणेंच अर्थ करितात हें त्या त्या प्रकरणीं मिताक्षरा व मयूख पाहिले असतां कोणाच्याही लक्षांत येईल. मास्तरांच्या ताब्यांत मुलें दिलीं म्हणजे मुलांस विकण्याचा किंवा गाहाण ठेवण्याचा हक्क मास्तरांस ज्याप्रमाणे येत नाहीं त्याप्रमाणेंच हा प्रकार आहे. यांत आमच्याविरूद्ध काहींएक नाहीं हें रा.ब. च्या लक्षांत यावयास पाहिजे होतें. धनग्रहणाचा व वारसाचा हक्क व प्रकारही असाच. असो; अखेरीस रा.ब. सच आम्ही इतकें सुचवितों कीं, स्त्रीस व पुत्रास विकण्यास पित्यास अधिकार नाहीं हें मत आमच्या सर्वच ग्रंथकारांस मान्य आहे असें मात्र त्यांनीं समजूं नये. हरिश्चंद्रानें आपल्या धर्मपत्नीचा व पुत्राचा विक्रय केला होआ व धर्मराजानें दौपदीस पणास लाविलें होतें या पौराणिक गोष्टी रा. ब. च्या लहानपणी तरी कानावरून गेल्या असतील. ह्या दोनही प्रकारांस शास्त्र अनुकूल आहे असा मिताक्षरादि ग्रंथकाराचा आशय आहे.

इतका कोटिक्रम झाला तरी रा. ब. स आपण लावलेल्याच "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" या वाक्याच्या अर्थाची शाश्वती कोठें वाटते आहे ? पशुवत् स्त्रियाची स्वतंत्रता नाहींशी झाली इतकाच याचा अर्थ आहे असे हे एकदा म्हणतात. फिरून वरील मताप्रमाणें कन्येवरील स्वत्व सर्वाशी जात नाहीं; "अशा स्थितीत अल्पवयांत लग्न झाल्याकारणानें पति आपल्यास संमत नाहीं म्हणून पत्नी (आम्ही रखमाबाईच म्हणणार होतो?) पतीकडे न जाता पित्याकडेच राहील तर त्यात राजानें दंड करण्यासारखा अपराध होतो असे कदापिही म्हणता येणार नाहीं. या संबंधानें "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" अशीं वचने स्मृतिग्रंथात आढळतात" असे रा. ब. नीं लिहिलें आहे ! काय ही धूर्तता व काय हें धाडस ! रा. ब. स असली कावेबाज वकिली करण्यास वक्तृत्वसमारंभाखेरीज दुसरें स्थळच नव्हतें काय ? वाचकहो! मागील वाक्यातील अवतरण चिन्हातर्गत मजकूर पुन: लक्ष देऊन वाचा म्हणजे रा. ब. च्या धूर्त विद्वत्तेबद्दल तुमची खात्री होईल ! आमचा रा.


  • आमच्या गाडीस बोरीचें चाक आहे व तुमच्या घरीं बोरीचें झाड आहे. तेव्हां तुमचा आमचा बादरायणसंबंध झाला ! आतां (भोजनोत्तर) तुमचे तुम्ही व आमचे आम्ही ! बादरायणसंबंध सागून भोजन उकळणा-या एका विप्राची ही गोष्ट आहे.