पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता ३१


कारण त्यास घेतल्यानें त्याच्या कुलांतील श्राद्धादिक करण्यास कोणी अधिकारी राहात नसे. यहूदी लोकांतही हाच प्रकार थोडाबहुत होता असें आढळतें. साराश, जुन्या काळचा इतिहास पाहिला असतां, त्यांत श्राद्धाचे, पितराचें, कुलाचारांचे व त्याबरोबर पुत्रोत्पादनाचें फारच प्राधान्य होते व असे असणें ही अगदी स्वभाविकच होतें. कारण हल्लींप्रमाणें लोकाचें दळणवळण त्या वेळेस वाढले नसल्यामुळें, आपलें कूळ व आपण या पलीकडे प्रत्येक मनुष्यास काहीं दिसत नसे;व कुळ नष्ट झालें म्हणजे अर्थातच या जगात आपलें नाव ठेवण्यास, त्या वेळेस दुसरा मार्ग नव्हता. हल्लीं आपणास कुलक्षयाची जी एवढी भीति वाटते, तिची तरी उपपत्ति वरील स्थितीवरून करावयाची. नाहींपेक्षा, दत्तकापेक्षा कुलाचें नाव राखण्यास हल्ली शतपट चांगले उपाय आहेत. असो, पण ज्या वेळेस हल्लीचे उपाय मुळींच ठाऊक नव्हते, व ज्या काळीं कूळ व कुलाचार याचेंच समाजात प्राबल्य होतें, त्या वेळेस कसें तरी करून नाव चालविणें, हे प्रत्येक मनुष्य आपले कर्तव्य समजत असे. औरस संतति नसली तर त्या काळी आपल्या इस्टेटीची हवी तशी व्यवस्था करण्याचा दुस-या कोणास अधिकार नव्हता. औरसपुत्र नसल्यास कोणास तरी दत्तक घेण्याची वहिवाट फार पुरातन काळापासून रोमन व ग्रीक लोकांत होती, व यहुदी लोकात तर आपल्याप्रमाणेंच मयताच्या विधवेस दिरापासून पुत्रोत्त्पत्ति करून घेण्याची परवानगी होती. या जुन्या ग्रंथातून मरतेसमयीं मृत्युपत्रानें दुस-यास देता येत नसे. निपुत्रिक मनुष्यास, मृत्युपत्र करून आपली इस्टेट लोकास देण्याचा अधिकार, ग्रीक लोकात सोलननें, व रोमन लोकात ट्वेल्व्हटेबलच्या (द्वादशाज्ञा) कर्त्यांनी प्रथमत: प्रचारात  आणिला; व हाच प्रकार वाढतां वाढतां पुढे दत्तकाच्या मुळावर आला, असें बहुतेक विद्वानाचें मत आहे. मागें सागितल्याप्रमाणे आपणांत, व ग्रीक आणि रोमन लोकांत, जो फरक दृष्टीस पडतो, तो येथेच. पिडदानादिक धर्मकृत्याशी व इस्टेटीशीं जो संबंध शास्त्रकारांनीं प्रथमत: जोडून दिला होता, तो ग्रीक व रोमन लोकांत लवकरच तुटला; व त्याबरोबरच धर्मशास्त्राचा इस्टेटीवरील पगडा सुटून, व्यावहारिक कायद्याप्रमाणें तिची व्यवस्था होऊं लागली. या व्यवस्थेपासून एकंदर राष्ट्राच्या रचनेंत काय काय फेरफार झाले, व मृत्युपत्राने दत्तकास कसकसे मागें टाकिलें, याची हकीकत पुढील खेपेस देऊं. पण आजच्या लेखावरून ध्यानात येईल कीं, दत्तकाचा प्रचार प्राचीन सर्व राष्ट्रात सुरूं होता, व त्याची कारणेंही सारखीच होतीं. म्हणजे पितराचें ऋण देण्याकरिता दत्तक घ्यावयाचा, अशी बहुतेक प्राचीन लोकांची सर्वत्र समजूत होती. परंतु काहीं राष्टात या समजुतींत लवकरच फरक होऊन, इस्टॅटीचा व पिंडोदकदानाचा काही संबंध नाहीं, असें ठरल्यामुळें पुढें दत्तकाची चाल प्रचारातून नाहीशी होत चालली व आमच्यासारख्या कांही राष्टांचे पहिल्या पायरीच्या पुढें मजलचा गेली नाही.