पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता २९

होत नाहीं. अशा प्रसंगी दत्तक घेणें अगदी जरूर आहे. एखादा कारखाना एकाकडेसच असल्याने जितका सुरळीत चालण्याचा संभव असतो, तितका बारभाई झाल्यानें असत नाही. कारखाना मोडला तर हजारो लोकांचे (इंग्लंडात एकेका गिरणींतून हजारांवर लोक असतात) नुकसान होते. म्हणून दत्तकाखेरीज दुसरा चागला मार्गच नाहीं. तथापि तेथेंही त्या कारखान्यातील सर्व उत्पन्न दत्तकास देण्याची आम्हांस जरूर दिसत नाहीं. कारखाना चालविण्यास त्यास उमेद येईल व त्याच्या श्रमाचा त्यास योग्य मोबदला मिळेल इतकें उत्पन्न त्यास देऊन, बाकी भाग लोकोपयोगाकडे लावण्यास कांहीं हरकत दिसत नाहीं. वरील दोनही अपवादासंबंधानें यापेक्षा काहीं जास्त लिहिण्याची गरज आहे, असें वाटत नाहीं. कारण दत्तक घेण्यास जी कारणे आम्ही आजपर्यंत दर्शविली आहेत, व त्यापैकी विशेषत: अर्थशास्त्रदृष्ट्या जी कारणें सागितलीं आहेत, त्यापैकीं एकही ह्या दोनही गोष्टीस लागू पडत नाही.

 दत्तक अनवश्यक म्हणण्यास दुसरें सबळ प्रमाण असे कीं, ही चाल पुरातन असून चागल्या सुधारलेल्या राष्ट्रातून आता अगदीं नष्ट होत चालली आहे, व कित्येकात झालीही आहे. या प्रमाणास इतकें महत्त्व देण्याचे कारण असे कीं, देशादेशांच्या इतिहासात, किती जरी अंतर असले, तथापि एकदर सुधारलेल्या राष्ट्रांच्या इतिहासाकडे दृष्टि दिली, तर असें नजरेंस येईल कीं,सुधारणा होण्यास म्हणून जीं साधनें आहेत, ती येथून तेथून सारखीच. आता सर्वच राष्ट्रे सारखीं सुधारलीं नव्हती, व नाहींतही; तरी जीं कांहीं हल्लीं सुधारलेल्या राष्ट्रात अग्रगण्य म्हणून मोडतात, त्याच्या सध्यांच्या स्थितीवरून एकंदर सुधारणेचा झोंक कोणीकडे आहे हे तेव्हाच दिसून येतें. परंपरागत चालत आलेल्या चाली होता होईपर्यंत सोडूं नयेत, असा मानवी स्वभाव असल्यामुळें, जेव्हा सुधारणेच्या मार्गास लागलेलें एखादें राष्ट्र आपली क्रमागत चाल सोडून देतें, किंवा तीत फेरफार करतें, तेव्हां साधारणत: असेच समजले पाहिजे की, ती चाल देशोन्नतीस काही तरी प्रतिबंधक होती, ए-हवी ती लोकानी कधी सोडली नसती. 'सुधारणेच्या मार्गास लागलेलें' असें म्हणण्याचे कारण की, ज्या राष्ट्राची सुधारणा खुटली आहे, त्यांत किंवा जीं सुधारलेल्या स्थितींतून रानटी स्थितींत जात आहेत, त्यात जर वरील प्रकार घडला तर त्यापासून काहीं अनुमान काढतां येणार नाहीं. उलट कदाचित् तो फेरफार आपण सुधारणास प्रतिकूल असें मानूं. ज्याप्रमाणे नदी वाहात असली, म्हणजे तिचे पाणे स्वच्छ व आरोग्यकारक असतें, व तीच वाहाण्याची बंद होऊन तींत डबकीं झाली, म्हणजे जशी पाण्यास दुर्गंधी येऊं लागते, त्याचप्रमाणें देशांतील सुधारणेचा प्रकार होय. एकदां सुधारणेंचें  पाऊल खुंटले, म्हणजे पूर्वीचे चांगले चांगले प्रघात देखील वाईट रूपास येतात: व तेंच सुधारणेचें पाणी वहात असलें म्हणजे बारीक सारीक वाईट आचारही निर्मल होऊन निघतात. वरील नियमास कांही अपवाद आहेत, नाहींत असे नाही. तथापि येवढी गोष्ट