पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ लो. टिळकांचे केसरींतील लेख

असतो. पण ज्यास एकदम इतकें द्रव्य मिळण्याचा मुळींच संभव नसतो व ज्याचा त्यावर कांही एक हक्क पोंचत नाहीं, आणि ज्यास द्रव्यसंपादनांत काय दु:ख आहे, हें मुळींच समजत नसतें, त्याचे हातीं एकदम इस्टेट पडल्यावर त्याने ती न उधळल्यास आश्चर्यच मानावयाचे. समाजानें मनुष्यास स्वार्जितावर जो हक्क दिला आहे तो वरील कारणाकरितां नाहीं. मिळविणाराने किंवा त्याच्या औरस संततीनें त्याचा उपभोग घ्यावा, पण या दोहोंच्या अभावीं दुस-या कोणत्याही व्यक्तीचा व समाजाचा त्यावर सारखाच हक्क आहे, इतकेच नव्हे तर एकाच मनुष्याच्या हातीं ती इस्टेट पडल्यास तिचा वाईट व्यय होण्याचा जास्त संभव आहे. यासाठी औरस संततीच्या अभावीं एखाद्याची इस्टेट देतां येत नव्हती, त्याकाळी दत्तकाचा प्रचार पडला; पण आतां त्याची काहीं जरूर राहिली नाही. उलट त्यापासून द्रव्यसंचय थोड्याशा लोकांतच राहिला जाऊन एकंदर समाजाचें नुकसान होत आहे.

        इतर सर्व गोष्टीप्रमाणेंच सर्वथैव निर्दोष अशी कोणतीच समाजरचना सांपडावयाची नाही. तथापि लोकस्थिति मनांत आणतां, अमुक एक समाजास अमुक समाजरचना विशेष फायदेशीर होईल, इतके सांगणे काही कठीण नाहीं. विभक्तावस्था व अविभक्तावस्था या दोन्हीही प्रत्येकी समाजास एका विशेष स्थितींत श्रेयस्कर होतात. पैकीं जोंपर्यंत द्रव्याचा खरा उपयोग लोकांस समजूं लागला नाही व जोंपर्यंत समाजाच्या कल्याणाकरितां द्रव्यसंचय करण्याची बुद्धि बहुतेकांस होत नाहीं, तोंपर्यंत मागें सांगितल्याप्रमाणेंच समाजाची अविभक्तावस्था म्हणजे जींत प्रत्येक मनुष्याचा आपल्या स्वार्जितावर पूर्ण हक्क असतो, तीच एकंदर समाजास हितावह आहे. असा हक्क दिल्याने कमजास्त प्रयत्न, मितव्यय, बुद्धि वगैरे कारणांनीं समाजांत द्रव्याचा विषम विभाग हा होणारच, व जोंपर्यंत स्वार्जितावर प्रत्येक मनुष्याचा पूर्ण हक्क आपण कबूल करितो, तोपर्यंत समाजांतील एक अतिशय श्रीमान् व एक अतिशय दरिद्री  हा भेद आपणास अजीबात कधींही काढून टाकतां येणार नाहीं. तरी स्वार्जितावर हा अधिकार दिल्याने समाजांत हा जो दोष दृष्टोत्पतीस येतो, तो काढून टाकण्याचा जेव्हां जेव्हां योग्य प्रसंग येईल, तेव्हां तेव्हां तो फुकट दवडिता कामा नये. दत्तक घेण्याची वेळ म्हणजे अशाच त-हेचा एक प्रसंग होय. यद्यपि द्रव्यसंचय करण्यास प्रत्येक मनुष्यास प्रेरणा व्हावी म्हणून स्वार्जितावर त्यास कायद्याने पूर्ण हक्क दिला आहे, तथापि एखाद्यास श्रमावांचून पुष्कळ द्रव्य सांपडल्यास त्यावर त्याचा पूर्ण हक्क आहे असा त्याचा अर्थ होत नाहीं. उद्या एखाद्यास सहज जमिनींत मोहोरांचा हंडा सांपडल्यावर सरकार म्हणजे समाजाचा प्रतिनिधी त्यावर त्या मनुष्याचा पूर्ण हक्क कबूल करील काय? नाहीं. तर त्या मनुष्यानें ही गोष्ट प्रसिद्ध केली, या त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यास कांही भांग देऊन बाकी सरकार आपल्या तिजोरींत नेईल, म्हणजे तो पैसा सरकारमार्फत (येथें सरकार लोकांचे