पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दत्तकाची आवश्यकता २५


त्यांत बहुधा समाजाचें हित होतें म्हणूनच तो दिला आहे, व त्याकरितां स्वार्जिताचा उपयोग समाजाच्या हिताकडे करणें, हे प्रत्येकाचें कर्तव्य आहे, ही गोष्ट कित्येक लोक विसरतात, व अज्ञानानें समाजांतील इतर लोक तिची उपेक्षा करितात. दुसरा दोष मागें सांगितलाच आहे, की असा अधिकार दिल्यानें कांहीं लोक श्रीमंत व पुष्कळ दरिद्री राहतात. आळशी लोक दरिद्री असल्यास, त्याबद्दल कोणास वाईट वाटणार नाही. पण दिवसभर उद्योग करणा-या लोकांस पोटभर अन्न न मिळणें समाजास श्रेयस्कर नाहीं. हे दोनही दोष जर निघतील तर स्वार्जितावर आपलें ज्यांत पूर्ण स्वत्व आहे, ती समाजरचना हितकारक आहे. आतां हे दोनही दोष निघाल्यास एकंदर लोकांच्या आचारांत व विचारांत बरेच फेरफार झाले पाहिजेत. विचारातील फरक म्हटला म्हणजे हा कीं, विनाकारण धर्माची किंवा दुस-या कशाची सबब सागून जर कोणी पैशाचा दुरूपयोग करूं लागेल, तर तो प्रकार लोकांत निंद्य मानला जावा, व तसेंच ख-या खोट्या कारणांचा विचार होऊन व निर्णय करून, त्यांचा लोकात प्रसार व्हावा. आचारांतील फरक असा कीं, मनुष्यास द्रव्यसंचय करण्यास उत्तेजन येईल त्याच्या स्वार्जितावर त्याचें स्वत्व ठेवून, मग ज्या चालीच्या योगानें द्रव्यसंचय समाजात वांटता येईल त्या चाली प्रचारांत याव्या, व तद्विरुद्ध प्रचारांतून काढून टाकाव्या. परोपकार करण्याची इच्छा वाढणे, विमा उतरणा-या मंडळ्या निघणे, वगैरे पहिल्या प्रकारचीं व दत्तक घेणें, वडील मुलासच सर्व इस्टेट मिळणे, वगैरे दुस-या प्रकारचीं उदाहरणें होत. या सर्वाचा विचार करण्यास सवड नाहीं, करितां दत्तकाचा यांशी संबंध कसा पोंचतो हे दाखवून आजचा लेख पुरा करितो.

         आपण असें समजूं कीं एका मनुष्याने आपल्या कष्टाने बरेंच द्रव्यसंपादन केलें आहे. आतां ज्या अर्थी समाजाच्या समतीवाचून हे द्रव्य त्यास संपादन करिता आलें नसतें, व ज्या अर्थी सार्वजनिक हितासाठीच समाजानें प्रत्येक मनुष्यास स्वार्जितावर पूर्ण हक्क दिला आहे, त्या अर्थी तहाहयात त्या द्रव्याचा आपल्या व समाजाच्या हितासाठीं व्यय करण्याचा त्या मनुष्यास पूर्ण अधिकार आहे. तसेंच त्याच्या पाठीमागे औरस  पुत्र असल्यास त्यासही ते द्रव्य देण्याचा त्यास अधिकार पोंचतो.कारण पुत्रादिकास जन्म देऊन, त्यांस त्या मनुष्याने एका विशेष गृहस्थितींत राहण्याची संवय लावून दिली आहे. तथापि जर तो मनुष्य आपल्या हयातीत द्रव्याचा गैरउपयोग करूं शकेल, किंवा आपल्या पाठीमागें पुत्रादिकांस ज्याप्रमाणें हक्क आहे तसा नसतांही, दुसरे कोणास तो जर आपली इस्टेट देऊं लागेल, तर तो प्रकार, शिष्टसांप्रदायाविरूद्ध समजून 'लोकभयाने' समाजानें बंद केला पाहिजे. द्रव्य संपादन करणा-या मनुष्यास मितव्ययाची संवय असल्यामुळें, त्याच्या  हातून द्रव्याचा भलतेच ठिकाणीं व्यय होत नाहीं, व त्याच्या कुटुंबातील मनुष्यांसही बहुधा ही संवय लागण्याचा संभव