पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ लो. टिळकांचे केसरींतींल लेख

समाजांतील अविभक्तावस्था, हा प्रकृत विषय नसल्यामुळें, त्यावरील सर्व आक्षेप येथें देतां येत नाहींत. तरी प्रस्तुत प्रकरणीं येवढें सागणें जरूर आहे, कीं कुटुंबाची व समाजाची अविभक्तावस्था ज्या देशांत मोडली आहे, त्यातच इतर देशापेक्षां द्रव्यसंचय अधिक झाला आहे. आपण मिळविलेल्या द्रव्यानें समाजाचें हित होऊन, त्यांत आपलेंही हित होणार, अशा विचारानें द्रव्यसंचय करण्याकडें मनुष्याची प्रवृत्ति स्वभावत:च होत नाहीं.'मी' व 'माझें' या शब्दांचा जितका परिणाम मनुष्याच्या मनावर होतो, तितका 'सामाजिक' किंवा 'सार्वजनिक' शब्दांचा होत नाहीं. "कोण कोणाचे? आपण मेलों म्हणजे जग बुडाले" असेंच म्हणणारे बहुतेक लोक असतात. व हें समजूनच प्रत्येक मनुष्याने मिळविलेल्या द्रव्यावर त्याचें पूर्ण स्वत्व शास्त्रकारानीं कबूल केलें आहे. आता प्रत्येक मनुष्यास असा अधिकार मिळाल्यानें, एकाजवळ लाखों रूपयाची इस्टेट, व दुसरा अगदीं कफल्लक, अशी स्थिति होते; पण सामाजिक हित जोंपर्यंत प्रत्येकास पूर्णपणे कळत नाहीं, तोपर्यंत अर्थशास्त्रसाधूंच्या मताप्रमाणे समाजरचना करून काय उपयोग? अशी रचना केल्यानें उगींच दुस-याकरिता आपण काय म्हणून काम करावे असें मनात येऊन कोणींच काहीं करूं नये, यापेक्षा ज्या समाजरचनेनें आपण मिळविलेल्या द्रव्यावर आपला पूर्ण हक्क असतो, ती बरी नव्हे काय ? मुळींच द्रव्यसंचय नसण्यापेक्षा दोनचार असामींनीच का तो केला असेना, तो त्या सर्व एकदर समाजासही फायदेशीरच आहे. संचय करण्यास मितव्यय कारण असल्यामुळें, जो द्रव्यसंचय करतो, त्याच्या हातून सहस त्याचा गैर उपयोग होत नाही, व असें झालें म्हणजे जरी त्या द्रव्यसंचयावर एकाचेंच स्वत्व असलें, तरी त्यापासून समाजाचें परंपरेने हित होतेच. एकदां मितव्ययाची संवय जडली, म्हणजे इतर संवयीप्रमाणें ती जन्मभर सुटत नाहीं. मग "नि:स्वोप्येकशतं शती दशशतं सो पीह लक्षं शतं" असें रहाटगाडगें सुरूं होऊन पैशाचे दोन पैसे करण्याची जी मालकाची इच्छा, तिनें पुष्कळ कारखाने निघून, हजारों लोक त्यावर आपला उदरनिर्वाह करितात ! तथापि, अशा समाजरचनेंत एक दोन मोठे दोष असतात. पैकीं पहिला हा, कीं प्रत्येक मनुष्यास स्वार्जित द्रव्यावर हक्क दिल्यानें, त्याच्या हातून त्याचा गैर उपयोग होण्याचा संभव असतो.कारण मागील अंकी सांगितल्याप्रमाणें कायद्यानें या कामांत कांहीं हात घालतां येत नाहीं. बाकी राहिले भय म्हटलें म्हणजे धर्माचें व लोकमताचें. पण त्यास लोक जाणते पाहिजेंत. नाही तर ब्राह्मणभोजन, लग्न, दत्तक, दारूबाजी यांत हजारों रुपयांचा चुराडा होऊन जातो. उघडच आहे, कीं पांचपन्नास रूपये दरमहा झडूं लागले, कीं घाल ब्राह्मणभोजन, कर दागिने, ठेव एखादें पाखरूं, किंवा आण तांबडें पाणी, असा जेथें लोकांचा समज, तेथें तो समज फिरल्याखेरीज द्रव्याचा अपव्यय कसा बंद करणार? तात्पर्य, मनुष्यमात्रास स्वार्जितावर जो हक्क आहे, तो स्वयंभू नाहीं, तर गेल्या अंकी सांगितल्याप्रमाणें समाजानें तो त्यास दिलेला असून,