पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळकांचे केसरीतील लेख

मध्येंही असेल तर मुलास हटकून प्राप्त झाला असें समजावें. यावरून नवराबायकोची एकच प्रकृति नसणे किती आवश्यक आहे हें उघडच आहे; कारण दोघांचीही जर कदाचित् कफप्रक्रकृतिच असेल तर मुलाना जन्मापासून अंतकालपर्यंत खोकला, दमा इत्यादि कफविकार जडून राहतील; दोघांचीही वातुल प्रकृति असल्यास ती मुलांमध्ये फार वृद्धिंगत होईल, व उभयतांत पित्ताधिक्य असल्यास मुलामध्ये पित्तप्रकोप अतोनात होईल. आईबापापैकीं एकालाच जरी मूळव्याध, उन्माद किंवा कुष्ठविकार असला तरी मुलापैकी एकाला तरी तो बहुधा प्राप्त झाल्यावांचून राहात नाहींच, मग ते विकार जर उभयतांना असातील तर काय दशा होईल तें सांगावयासच नको. एकाच घराण्यांतील मनुष्याची प्रकृति बहुधा एकाच त-हेची असते. कारण, ती एकाच मूळपुरुषाची संतति असल्यामुळें व त्यांचे आहार-विहार बहुधा सरखे असल्यामुळें, मूलापुरुषाच्याच प्रकृतीची प्रतिमा कमीजास्त प्रमाणाने सर्वात उतरली असते. मूळ प्रकृति, मूळ स्वभाव व मूळ रचना याचा वंश परंपरेने थोड्याबहुत प्रमाणानें चालू राहण्याचा जो धर्म तो इतका स्थिर आहे की,हजारों पिढ्यानंतर देखील तो आपले अस्तित्व थोडेसें तरी प्रकट केल्यावांचून राहात नाहीं. ही गोष्ट आमच्या विचारी पूर्वजांच्या मनांत पुर्णपणे बिंबली असल्यामुळे मनुयाज्ञवल्क्यादि स्मृतिकरानीं लग्नाच्या बाबतींत पहिला नियम असा कठीण घालून ठेविला आहे कीं, ज्या स्त्रीशी आपल्यास विवाह करावयाचा असेल ती आपल्याशी सपिड नसावी. एवढेच नव्हे, तर ती आपल्या गोत्रांतील देखील नसावी. लग्नसंबंधी इतर नियम कदाचित् टाकतां येतील, व कारणपरत्वें लोक त्याचा अतिक्रम करितात, परंतु हा नियम अगदीच अलंघनीय आहे. पाहा,काहीं काही प्रसंगी आपल्या पूर्वजाचे विचार किती सूक्ष्म असत ! जामदग्न्य गोत्राचे जितके लोक आज आढळतात, तितके सारे जमदग्निॠषीच्या वंशांतले. हे द्वापार-युगांतील नातें जें आजपर्यंत आम्ही पाळीत आलों आहों, तें या मन्वादिकांच्या कठीण वाक्यामुळें; व हा कठीण नियम वर सागितलेल्या शारीरसंबंधी माहितीनें त्यानी स्थापिला आहे. असो, यावरून एवढेंच लक्षांत आणिलें पहिजे की, एकाच प्रकृतीच्या वधूवराची गाठ जेणेंकरून पडणार नाहीं, असा एक उपाय आपल्या समजुतीप्रमाणें पुरातन ॠषींनीं शोधून काढिला. ज्याप्रमाणें एकाच घराण्यांतील मनुष्याची प्रकृति बहुधा सारखी असते, त्याचप्रमाणें एकाच देशातील लोकाच्या प्रकृतींमध्ये हवा, पाणी, आहार, विहार यांच्या समानतेमुळें एक प्रकारचें साम्य असते. उदाहरणार्थ, उत्तर हिंदुस्थानांतील भय्ये लोकाची तापट पित्तप्रकृति, कोंकणातील लोकाची सौम्य व कफप्रकृति,मावळे लोकाची तीव्र व वातप्रकृति ई. तसेच रत्नागिरीकडच्या कोंकणस्थांच्या बायकाचे घारे, पिचके व अधू डोळे, कारवार प्रातांतील फिकट चेहेरे, इत्यादि उदाहरणांवरून तद्देशीय लोकाचे प्रकृतिवैलक्षण्य सिद्ध होतें. हें जर खरें आहे, तर एकाच कुलांतील लोकांचा परस्पर विवाह झाल्याने एकाच प्रकृतीचा मेळ मिळून ती प्रकृति संतती-