पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कोंकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे

सुद्धां अनुरुपत्वाचा विचार करणें फार जरूर आहे. यासाठी कोकणस्थ, देशस्थ, आणि कऱ्हाडे याचीं परस्परांशी जर लग्नें होऊं लागलीं तर केवढी मजा होईल!! एका मुलीचें लग्न करावयाचे असलें तर या तीन वर्गातील मुलांतून वराची योजना करण्यास सांपदेल्; पांचपंचवीस मुलास मनास येण्याजोगा मुलगा सापडण्याचा जो संभव आहे त्यापेक्षां शेंदोनशेत तो अधिक आहे. असें झाल्याने उभयता स्त्रीपुरुषे सुखी होतील इतकेच् नहीं, तर उभयपक्षीं मातापितरें निष्काळजी होतील व मुलाबाळांचे संगोपन चांगल्या रीतीनें होऊन पुढील पिढी सुखी होण्याचा संभव आहे. जसें मूळ तशी नक्कल. उभयतां मागापितरेंच विद्याशील, सद्गुणी आणि रूपसपन्न असल्यावर दुर्गुणी व कुरूप संतति होण्याचा संभवच नाही. पण अशा प्रकारें स्वत: सुखानें राहून आईबापास आनंद देणारीं व देशास भूषणास्पद अशी स्त्रीपुरुषाची द्वंद्वें कोंकणस्थ, देशस्थ आणि कऱ्हाडे हे त्रिवर्ग एकत्र केल्याशिवाय फार कोठून सापडणार?

 बरेच दिवसापासून देशस्थाची व कोंकणस्थांची असावी तशी मैत्री जमत नाही. इतिहासावरून कधीं कधीं दोघामध्यें अधिकाराच्या संबंधाने तंटा झाल्याचें आढळून येतें. हे द्वैत मोडोन टाकण्याविषयीं श्रीमंत पेशवे यानीं स्वत: कऱ्हाड्यांच्या आणि देशस्थांच्या मुली करून घेऊन खटपट केली होती. त्या वेळचे महाविख्यात पंडित वे. शा. संपन्न रामशास्त्रीबोवा याचेंही मत नसेंच होतें. दुर्दैवाने पेशव्यांचे राज्य फार दिवस राहिलें नाहीं व त्यामुळें हें इष्ट कार्य सिद्धीस गेलें नाहीं, हे फार शोचनीय होय. पण सर्वजण मनावर घेतील तर ही गोष्ट तडीस जाणें अगदीं दुरापास्त आहे, असें आम्हास वाटत नाही.

( २ )

 मागील निबंधांत या तीन शाखांच्या ब्राम्हणामध्यें लग्नव्यवहार सुरू झाल्यापासून होणा-या फायद्याचें आम्हीं थोडेंसे दिग्दर्शन करुन शेवटी असें सुचविलें आहे कीं, या गोष्टीपासून शरीर दृढ होण्याचाही फार संभव आहे. तो कसा, हें आता सागितलें पाहिजे. सर्वाच्या पाहाण्यात आहेच कीं, मुलांची प्रकृति, शक्ति, स्वभाव, शरीर व मानसिक रचना ही बहुधा आईबापांच्या प्रमाणेच असतात. ह्यापैकीं काहीं गोष्टी बापाकडून व काहीं आईकडून प्राप्त होतात. ही गोष्ट फार प्राचीन काळापासून सर्वमान्य असल्यामुळें व 'प्रजामनुप्रजायसे' इत्यादि श्रुतिवाक्यांवरून व 'एतत् षाट्कौशिकं शरीरं त्रीणि मातृतस्त्रीणि पितृत:| अस्थिस्त्रायुमज्जान: पितृत:| त्वंङमांसरूपधिराणि मातृत:' इत्यादि गर्भोपनिषदांतील वाक्यावरून निर्विवाद झाली आहे. ह्यावरून उधड आहे कीं, मातापितरास जर काहीं शारीरिक किंवा मानसिक विकार असतील तर ते विकार मुलामध्ये देखील प्रकट होतील. आणखी असा एक नियम आहे कीं, आईबापापैकीं एकास एखादा विकार असेल तर तो कदाचित् मुलास प्राप्त होईल किंवा न होईल, परंतु जर तोच विकार दोघा-