पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रीरूप इंगळीने नांगी मारली, तर माणूस कामासक्त होतो. तिच्या प्राप्तीसाठी वेडापिसा होतो. बड़ी भ्रष्ट होते. अविचार मनात येऊ लागतात. तिची आसक्ती जीवाचा नाश करते. या विंचवाचा उतारा सांगताना एकनाथ म्हणतात, सत्त्वगुणाची वृद्धी केली पाहिजे. सत्त्व वाढीस लागला, की रजो व तमोगुण आपोआपच कमी होतात. वाईट विचार मनात येत नाहीत. विंचू उतरल्यावर जी काही थोडीफार फुणफुण राहील, ती गुरुमाऊलींच्या स्मरणाने शांत होऊन जाईल.
 नाथांचे हे भारूड मोठेच लोकप्रिय आहे. ग्रामीण भागात बोलीभाषेचा वापर करून शब्दरचना सोपी करण्याचा प्रयत्न करीत यात नाट्य आणून हे भारूड साभिनय रंगविण्यात येते. विचू चावल्याचा अभिनय केला जातो.

'अगं गं गं गंगं गं...
विंचू चावला...
आता काय मी करू विंचू चावला...
अगं आई मला विंचू चावला.../

 अशी शब्दरचना या भारुडात करून अभिनयाला परिपोष मिळवला जातो. त्यामुळे हे लोकांचे लक्ष वेधून घेण्यात जास्त यशस्वी ठरते.
 एकनाथांनी कोडी-कुटे यांच्या रचनेतून भारुडे लिहिताना क्षणभर मनुष्याला गोंधळात पाडले आहे, विचार करायला लावला आहे. विचारवंतांच्याही मनाला भूल पाडणारी व वेगळा आनंद मिळवून देणारी नाथांची ही भारुडे आहेत.

नाथाच्या घरची उलटीच खूण।
पाण्याला मोठी लागली तहान।
आजी म्यां एक नवल देखिले।
वळचणीचे पाणी आढ्या लागले।
हांडी खादली भात टाकिला।
बकऱ्यापुढे देव कापिला।

 यातल्या काही गोष्टी लौकिकात न घडणाऱ्या, पाण्याला तहान लागणे, वळचणीचे पाणी आढ्याला लागणे, बकऱ्यापुढे देव कापणे या सगळ्या लौकिकाच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टी; पण हेच कोडे तात्त्विक सिद्धांताच्या आधाराने सोडविण्याचा प्रयत्न केला, की अर्थाचे स्वरूप स्पष्ट होत जाते. पाण्याला तहान लागणे म्हणजे आत्म्याला परमात्म्याची ओढ लागणे. वळचणीचे पाणी आढ्यास लागणे म्हणजे जीवचैतन्य समष्टीरूप होणे. आत्मा आणि परमात्मा एकरूप होणे, त्यातला भेद संपून जाणे. हांडी खादली - भात टाकिला याचा अर्थ देहरूपी हंडीमध्ये असलेला परमात्मरूपी भात न

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ९८॥