पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .

ज्ञानपोत पाजळतो
बोध परडी हाती घेतो
प्रेमाचा पाऊल पुढे ठेवतो
अहं शंखासुर दैत्य बळी देतो.

 बोधाची परडी हातात घेऊन ज्ञानपोत पाजळून अहंकारी शंखासुराला बळी देत महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आहे.
 सगळ्यांचे भविष्य सांगत गावोगावी फिरणारे जोशी त्यांच्या मुखातून नाथ भारूड लिहितात.

मी आलो रायाचा जोशी
होरा ऐकाजी मायबाप
येथून पुढे बरे होईल
भक्ती सुखे दोंद वाढेल
फेरा चौऱ्यांशीचा चुकेल
धन मोकाशी
मी आलो रायाचा जोशी

 तुम्ही सद्गुरूला शरण गेलात त्यामुळे आता विषमता संपेल, अज्ञान दूर होईल, विवेक वाढीस लागेल, तुम्हाला चांगले दिवस येतील, असे भविष्यमान हा जोशी सांगतो, पण त्यासाठी सद्गुरूला शरण जाणे महत्त्वाचे आहे, हेही तो लोकमानसाच्या मनावर भारुडाच्या रूपाने बिंबवतो.
 एकनाथांनी जाती-व्यवसाय दर्शविणारी भारुडेही लिहिली आहेत. भट-भटीण, महार-महारीण, माळी, कंजारीण, वैदीण, शारीरिक व्यंगाच्या माध्यमातून म्हणजे मुका, आंधळा, बहिरा, नकटा यातून भारुडांची रचना त्यांनी केली आहे.

मुका झालो वाचा गेली॥
होतो पंडितमहाज्ञानी। दशग्रंथ षट्शास्त्रपुराणी
चारी वेद मुखोद्गतवाणी। गर्वामध्ये झाली सर्व हानी॥
जिव्हा लाचावली भोजना। दुग्धघृत शर्करा पक्वान्ना
निंदिले उपान्ना। लेणे पातळो मुखबंधना॥
या साधुसंताची निंदा केली। हरिभक्ताची स्तुती नाही केली
तेणे वाचा पंगु झाली। एका जनार्दनी कृपा लाधली॥

 एकेकाळी वाचा असून असणाऱ्या ज्ञानाचा गर्व केला. भोजनाची अति-इच्छा केली. साधुसंताची निंदा केली. हरिभक्ताची स्तुती केली नाही. परिणामी वाचा जाऊन मुकेपण आले. यातही प्रबोधन

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ९३ ॥