पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असं म्हणून कुर्मदास म्हणतो विठ्ठलाला माझा मनोभावे नमस्कार कळवा. माझ्या मनात त्याच्याविषयी असलेली अपार भक्ती आणि प्रेम आहे, आदर आहे, हे विठ्ठलाला कळवा. गरुड तो निरोप घेऊन येतो. विठ्ठल मनाशी हसतो. नामदेवाची परीक्षा घ्यायचं मनात येतं. नामदेवाचा अहंकार विठ्ठलाच्या ध्यानी आलेला असतो.
 गरुडाचा निरोप मिळाल्यावर ज्ञानदेव आणि नामदेवाला घेऊन विठ्ठल कुर्मदासाकडे निघतो

श्री क्षेत्र पंढरपूर । रुक्मिणीवर
निघाले संतपरीक्षेला
संगे ज्ञानोबा. नामदेवाला॥
एक ताटी जेवला भोजनाला।

 तिघे चालले असताना वाटेत सावता माळ्याचा मळा दिसला. हिरवागार बहरलेला मळा पाहून विठ्ठलाच्या मनी येते, नामदेवाच्या गर्वहरणाची ही चांगली वेळ आहे. विठ्ठल प्रत्यक्ष परमेश्वरच

न कळे ईश्वरी माया
गर्व उतराया।
थोडे थांबवले दोघा जणाला
सावता माळ्याच्या कुंपणाला

 विठ्ठल म्हणाला, मी थकलोय. बरेच अंतर चाललो. मला तहान लागली आहे. तुम्ही दोघे इथंच थांबा. या हिरव्यागार मळ्यात जाऊन कुठूनतरी मी पाणी पिऊन येतो. ज्ञानदेव आणि नामदेव दोघांना मळ्याच्या कुंपणापाशी उभा करून विठ्ठल सावता माळ्याकडे गेले. समोर प्रत्यक्ष परमेश्वर उभा पाहन सावतामाळी धन्य झाला. त्याला गहिवरून आले. तो विठ्ठलाच्या सामोर आला व त्याला त्याने वंदन केले. देवाने मग नाटक करायचे ठरवले आणि सावता माळ्याला तो म्हणाला,

 दोघे मिळून लागला पाठी
लूटायासाठी।
कुठेतरी जागा पाहून मजला
लपवून ठेव, थरकाप सुटला॥

 या दोनजण मिळून माझ्या पाठीमागे लागले आहेत. मला लुटण्यासाठी ते केव्हापासून माझा पाठलाग करत आहेत. आता तू कुठंतरी चांगलीशी जागा पाहून मला लपवून ठेव. भीतीनं माझ्या अंगाचा अगदी थरकाप सुटला आहे. विठ्ठलाची ही स्थिती पाहून सावता माळ्यानं क्षणभर विचार केला आणि प्रत्यक्ष परमेश्वरच सांगतोय म्हटल्यावर त्याला ते खरंही वाटलं. तो हात जोडून

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ८७॥