पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वरूप असते. वाघ्या-मुरळी मल्हारीची खूप गीते गातात. त्यात मल्हारीच्या लग्नाचं वर्णन कथागीत आहे.
 यामध्ये मल्हारीचं लग्न कुठं लागलं, सीमान्त पूजन कुठं झालं, हळद कशी लागली, तेलन पडणे समारंभ, नवरदेवाच्या जेवणाच्या पंक्ती, लग्नाचा मांडव कसा होता, नवरदेवाला म्हणजे मल्हारीचा कंकण बांधण्याचा समारंभ या सर्वांचं वर्णन येतं. लग्नाच्या मंडपाचे वर्णनात,

मांडव घातले पितळी लाखा
तांबानी मेरव सोनेरी देखा
मांडव गडावर निमनं झाड
छाया पडे धम्मा घोर
छाया खाली देव रमल!

 मल्हारीच्या लग्नाचं वर्णन करताना ऐकणाऱ्याइतकाच करणाराही रमतो. मल्हारी बाणाई, म्हाळसा यांच्या कथा रंजक आहेत. त्यात देवाचं मानुषीकरण आहे. ते लोकमानसाला जास्त भावणारं आहे. मल्हारीच्या लग्नाचा वृत्तांत सांगताना म्हटलं आहे,

नवरदेवाचे सीमांत पुजिले मालेगावात
घोडा चंदनपुरीत
नवरदेवाचे कंकण सुटले काकण बंडीत
करवल्या माहुरगडात

 सांस्कृतिकदृष्ट्या या कथागीतातून धनगर समाजातील लग्नसमारंभ कशा पद्धतीने साजरा होतो, याचे वर्णन येते. लोककथागीतामध्येच विठ्ठलाने घेतलेल्या संतपरीक्षेची ही एक सुंदर कथा आहे. ओवी रचनेत ही कथा गुंफली अहे. नामदेवाला विठ्ठलाच्या जवळीकीचा थोडा अहंकार झाला होता. आपलं विठ्ठल ऐकतो, आपल्याबराबेर तो एका ताटात जेवतो, या भावनेने नामदेवाचा अहं सुखावला होता, तेव्हा विठ्ठलालाही इच्छा झाली त्याला कुर्मदासाची भक्ती दाखवावी म्हणून प्रथम विठ्ठल आपले वाहन गरुड याला कुर्मदासाला आणण्यासाठी पाठवतो. विठ्ठल म्हणजे विष्णूच. विष्णूचं म्हणजे विठ्ठलाचं वाहन गरुड कुर्मदासाकडे येतं; पण कुर्मदास हा विठ्ठलाचा परमभक्त. तो हात जोडून गरुडाला म्हणाला,

देव पिता, माता रुक्मिण
त्यांचे तुम्ही वाहन।
पाय कसे लावू सिंहासनाला
ठेवतो चरणी मस्तकाला।

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ८६॥