पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेटायला तिच्या घरी येतो. कृष्णाने राईचे रूप घेतल्यामुळे त्याला कोणीच ओळखत नाही.
 चंद्रावळीच्या पतीला व सासूला साधा संशयही येत नाही. खूप दिवसांनी बहीण भेटायला आली, त्या दोघींना गप्पा मारता याव्यात. मनातलं गुज एकमेकींना मोकळेपणी सांगता यावं म्हणून चंद्रावळीचा पती राईरूपी कृष्णाला चंद्रावळीच्या खोलीतच झोपायला सांगतो. रात्री मग कृष्ण स्वरूपात प्रकट होतो व चंद्रावळीचा उपभोग घेतो. खूप वेळ तिच्या संगती मिळावा म्हणून कृष्ण ती रात्र सहा महिन्यांची करतो आणि नंतर गोसाव्याचे रूप घेऊन निघून जातो, असे लोककथागीतात वर्णन येते; पण कृष्णसंगतीचा काळ चंद्रावळी विसरू शकत नाही. तिचा नूर कोमेजतो. दारातली तुळसही वाळून जाते. तिचा पती तिला त्याचे कारण विचारतो तेव्हा शेवटी ती म्हणते,

गोसाव्याने युगत लावली
त्याचा हात बा लागला

 लोककथागीतांतून आलेले कृष्णाचे वर्णन व वर्तन त्याच्यातल्या रंगेल नायकाचे रूप प्रकट करते.
 या लोककथागीतात काही वर्णनं मोठी सुंदर आहेत त्यात चंद्रावळी मथुरेच्या बाजारात जातानाचे वर्णन

आणलं साथीशी नंदी, ओढलं रेशमी पठाड
घेतल्या सोनीयाच्या मेखा, घेतली रेशमांची दावी

 असं केलं आहे. चंद्रावळी हीच या लोककथा गीताची नायिका आहे. तिचं व्यक्तिमत्त्व, तिचं वागणं, तिचा वेशीराख्याबरोबरचा संवाद यातून साकार होत जातो. त्या दोघांतला संवाद चंद्रावळीचा बाणेदारपणा स्पष्ट करतो.

ती म्हणते,
'अरं तू येशीराख्या दादा, आहेस कुणाईचा कोण?' तो म्हणतो,
'मी कान्हाचा नोकर
तू कुणाईची कोण?'
ती म्हणते,
'मी गवळ्याची गवळण'

 अशी संवादांची खुमासदार पेरणी या लोककथागीतात झाल्याने ते सगळं ऐकताना माणसं रंगून जातात. या सर्वांबरोबर त्या वेळचं समाजजीवन, गवळ्यांचं जीवन, कृष्णचंद्रावळ शृंगार हे सगळंही या गीतातून सामोरी येतं.

 काही लोककथागीतांमध्ये कथा फारशी नसते. एखादी घटना आणि तिचे वर्णन असे त्याचे

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ८५ ॥