पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गवळणीवरून अनेक गीतं प्रचलित आहेत. राई आणि चंद्रावळ यांच्या संबंधात कृष्णाच्या आयुष्यावरीलच एक लोककथागीत लोकप्रिय आहे.
 राई आणि चंद्रावळ या दोन्ही कृष्णाच्याच गवळणी. दोन्ही त्याच्या आवडत्या; पण राईचे लग कृष्णाशी होते आणि चंद्रावळीचे दुसऱ्या एका गवळ्याशी होते; पण चंद्रावळींच्या मनात एकटा विचार येतो, की राईला जाऊन भेटावं. खूप दिवस तिची गाठ-भेट नाही. ती मनातला विचार सासूला सांगते. सासूला राईचे कृष्णाशी लग्न झालेय हे माहिती आहे. तिला कृष्णाविषयीच्या वेगवेगळ्या अफवा माहिती असतात. ती चंद्रावळीला सांगते,

नको गं नको चंद्रावळी
मथुरेचा कान्हा आखाळी
नारी पुरुषांच्या भोगितो

 कृष्ण हा चारित्र्याने चांगला नाही आणि तो परस्त्रीची अब्रू लुटतो, त्यामुळं तू त्याच्याकडे जाऊ नको, असं तिची सासू सांगते; पण चंद्रावळीच्या मनात राईला भेटायची उत्कट इच्छा असते. त्यामुळे दही-दूध घेऊन ती मथुरेच्या बाजारात येते. तिच्याबरोबर इतर गौळणीही असतात. ही बातमी वेशीराख्या कृष्णाला कळवतो; पण कृष्ण त्यालाच त्यांच्याकडून अशीलदान घ्यायला सांगतो; पण चंद्रावळ ही निर्भय आहे. तितकीच बंडखोरही आहे. तिला ते आवडत नाही. ती वेशीराख्याला खडसावते व बाणेदार उत्तर देते. कथागीतात ते सुंदर वर्णन आले आहे. ती म्हणते,

होऊ दे दह्याचा विकरा, होऊ दे लोण्याचा विकरा
होऊ दे तुपाचा विकरा, उरू दे बेरी ना बा शेरी
मग घालीन तुझ्या तळहातावरी,
उठा साथीच्या गवळणी, द्या गं तोंडीच्या तोंडी
उपटा माथीयाची शेंडी

 चंद्रावळ व साथीच्या गौळणी वेशीराख्याची शेंडी उपटतात, त्याची काठी पळवून त्यालाच हुसकावून लावतात. ही तक्रार घेऊन वेशीराखा कृष्णाकडे जातो. मग कृष्ण स्वत:च वेशीराख्या म्हणून येतो; पण तोपर्यंत चंद्रावळ रागाला आलेली असते. ती राईला न भेटताच जायला निघते. तेव्हा कृष्ण तिला तिनं राईला भेटावं म्हणून विनवण्या करायला लागतो. तिला न भेटता जाऊ नको म्हणतो; पण माझा पती खट आहे, मला वेळ झाला, मी जाते म्हणून जायला लागते. कृष्णाचं ती न ऐकता परत निघून येते. राईला न भेटता. कृष्णही तिच्या पतीचा अपमानकारक शब्दांनी उल्लेख करतो. त्याचा चंद्रावळीला राग येतो.

 पण नंतर कृष्ण स्वत:च राईजवळ तिचा स्त्रीवेष मागतो आणि राईचे रूप घेऊन तो चंद्रावळीला

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ८४ ॥