पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या कथागीतात ओघवती भाषा दैनंदिन जीवनातीलच आहे, प्रवाही आहे, त्यामुळे मनाची पकड घेते. गीताचा गोडवा वाढवते, अशी खूपशी लोककथागीतं मनाला स्पर्श करणारी आहेत.
 सखुबाईचे गाणे, गांधारीचा वसा, शिव-पार्वतीचा डाव, चांगुणेची गोष्ट, चंद्रावळ ही सगळी कथागीते पाहिली, की त्यामागे स्त्रीमनाची सुप्त भावना दिसून येते. शिव-पार्वतीच्या गाण्यात गिरजा शंकराच्या आठवणीने अस्वस्थ होते व भिल्लीणीचे रूप घेते, त्याचे वर्णनही मोठे विलोभनीय येते.

मन्नाचा घट केला, बेस भिल्लिणीचा घेतला
चोळी उरफाटी अंगाला, बाणाचा भाता पाठीला काय
हाती तीरकमठा घेतला, चुन्याची टिकली गालाला

 साध्या-सोप्या भाषेतले हे वर्णन कथागीताला जनमानसाच्या मनापर्यंत नेते व रमवते.
 संत सखूचे गाण्यातही तिची पांडुरंग भक्ती, तिची पूजा, सासूशी होणारा संवाद हे सगळं येत. तिच्या भक्तिमार्गात येणारे अडथळे येतात. सासूकडून तिचा छळ होतो; पण तिची भक्ती भंगत नाही या कथागीतातही

सखुबाईच्या सोबतिणी घरी आल्या सांगत सासूशी
सून सखुबाई तुमची गेली पंढरीशी
सखुबाईच्या सासूला राग आला जाऊनी सांगती पुत्राशी
हातात काठी लागे पाठी, सखू अडवली रस्त्याशी
हाणून मारून सखू आणली घराशी, दोर लावला खोलीमधी
कोंडून टाकली

 या कथागीतात छळणारे सासू-सासरे आहेत, कान भरणाऱ्या बायका आहेत. साक्षात भगवंत आणि रुक्मिणीही आहेत. या कथागीताचा शेवट सखूची स्तुती करतो

धन्य धन्य सखू सून तू भाग्याची खरी
नाना हा सिखू सखू म्हणून आठवू कुठवरी

 या कथागीतात त्या काळचे स्त्रीजीवन येते. त्यांची देवभोळी मानसिकता येते; पण त्याचबरोबर सखूच्या रूपाने एक आदर्श येतो. श्रद्धा दिसून येते हेही खरं.

 आपल्या लोकसंस्कृतीत तर कृष्णाबद्दलच्या अनेक कथा प्रचलित आहेत. अगदी वासुदेवसद्धा त्याच्या अनेक गीतांतून कृष्णमहिमा वर्णन करतो. अनेक गौळणी कृष्णाच्या आयुष्यावरील घटना व त्याचं वर्णन करतात. त्याच्या बाललीला, रासलीला, कालिया मर्दन, कंस वध अशा विषयावरच्या अनेक कथा लोककथा गीतांतूनही आल्या आहेत. मुळात कृष्ण या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. सर्वसामान्यांना तो आपल्यातला वाटतो. तो जितका दैवी आहे तितका मानुषी आहे. कृष्ण आणि त्या

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ८३ ॥