पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माहेरच्या माणसांनी तिला सांभाळलेलं असतं. या नात्यात सगळीच वाईट नसतात; पण चढउताराचं सावट नात्यांवर पडत राहतंच. लोकजीवनात स्त्रीच्या आयुष्यात एक वेगळं सोसणं नोंदलं गेलं आहे. तिचा तो सुख-दुःखाचा हुंकार, ओवी, लोकगीतांसारख्या माध्यमातून तिनं व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे; पण त्यात कोणाबद्दलच दुष्टावा नाही, वैर नाही. मनाच्या तळवटातलं दु:ख कुठंतरी विसाव्याच्या ठिकाणी व्यक्त करावसं वाटतं. मग त्यासाठी जातं माध्यम बनतं आणि दुःखाची ओवी बनते. कधी मैत्रिणींच्या बरोबर खेळाच्या साह्यानं झिम्मा-फुगडी खेळताना, झोका चढवताना ते लोकगीत बनतं इतकंच; पण या सासर-माहेरच्या दालनात तिचं पुरं आयुष्य हिंदोळा घेत पूर्तीकडं धावत असतं.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ७८ ॥