पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मायेसारखी गं माया। येईना पुरुषाला।
झाडामंदी वूरक्षाला। फूल येईना शेराला।
हजार माझं गोत। झाडीचा झाडपाला।
माय बाईच्या माझ्या। मीत चींचंच्या सावलीला।
मायेवाचून माहेर। कंथावाचूनी सासर।
सांगतं सईबाई। बाळावांचूनी गं घर।

 कोणा सईबाईच्या मनातली व्यथा या लोकगीतातून सामोरी आली अहे. मायेच्या प्रेमाची अनेक लोकगीते आढळतात. त्यामानाने सासूच्या छळाची कमी लोकगीतं आहेत. भावजयांच्या बाबतीत मात्र बरीच गाणी हेत. नणंद-भावजय नातं माहेराच्या बाबतीत महत्त्वाचे ठरतंच. कारण भावांना जरी बहिणीचं प्रेम वाटत असलं, तरी तितका प्रेमाचा ओलावा भावजयांना नणंदाबद्दल वाटत नाही. त्यांना नणंदा क़ळ लावणाऱ्या वैऱ्यासारख्या वाटतात. त्यांना वाटतं नणंदा आपला तोरा मिरवतील. माहेराहून काही ना काही सतत नेत राहतील.

भाऊ गं म्हणती  आल्या बहिणी भेटायाला
भावजया गं म्हणती  आल्या नणंदा लुटायाला॥
भाऊ गं म्हणती  बहिणीला द्यावा पाट
भावजया गं म्हणती  धरू दे नणंदा आपली वाट ।

 पण असं सगळं असूनही बहीण-भावाचं कधी वाईट चिंतत नाही. तिला एखादा तरी भाऊ असावा असं वाटतं. त्याच्याशी मनीचं गुज बोलता येईल. आईबापामागं एक वाट ओलाव्याची राहील म्हणून आईबहिणी लोकगीतातही म्हणतात,

बहिणीला भाऊ  एक तरी गे असावा
पावल्याचा खण  एका रात्रीचा विसावा

 अगदी फार दिवस नाही तरी एक रात्र तरी माहेर म्हणून त्याच्याकडे जाता येईल, ही आशा तिला वाटते. बाईच्या जातीला म्हणूनच माहेरापुढं धनदौलतीचं कौतुक वाटत नाही. माहेर नसेल तर त्याचं दुःख कुठलीच दौलतही कमी करणार नाही, म्हणून प्रत्येक सासुरवाशीण देवालाही मागताना धनदौलत । संपत्ती मागत नाही तर ती म्हणते,

देवबाप्पा नको देऊ धन तू दौलत
द्यावं माहेर खेळाया मायबापाच्या सावलीत

 स्त्रीच्या आयुष्याची सासर आणि माहेर ही दोन महत्त्वाची दालनं असतात. तिचं भावविश्वच खरंतर नात्यागोत्याभोवती बांधील असतं. सासरची माणसं तिला सांभाळायची असतात आणि

लोकसंस्कृतीचा भारा ।। ७७॥