पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझे ल्हाने बंधु माझ्या माऊलीचे झेंडे
सांगावा कासाराला बैस मैदानी मैदानी
बहिनी आम्ही लईजणी संग बंधवाची राणी
जाता माहाराला उंच पाऊल पडे
बापजी बयाबाई गंगासागर येती पुढे!

 माहेरचं वर्णन करताना तिची विलक्षण प्रतिभाच जणू सामोरी येते. माहेरची माणसं, भावजया, पिता, आई सगळा गोतावळा तिच्या मनात गुंजी घालतो. तिथल्या सुखात ती मनातल्या मनात पुन्हा पुन्हा न्हाऊन निघते.
 पण हेच बाईचे माहेर व तिचे तिथले कौतुक आई-बाप आहेत तोवरच आहे, याचीही तिला जाणीव आहे. त्यांच्यानंतर माहेर फक्त नावापुरतं उरणार हे तिला सतत जाणवत आहे; पण तरी भावाविषयी मात्र तिला अपार प्रेम आहे. तिथल्या भावजयांचा मात्र तिला भरवसा वाटत नाही; पण जोवर आपला बाप आणि आई जिवंत आहे, तोवर तिला काळजी नाही.
 बहिणाबाईंनीही माय-लेक आणि माहेराचं नात सांगताना म्हटलं आहे.

ऐक, ऐक योग्या ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते

 हे एक विलक्षण नाळबंध सत्य जे चिरकालासाठी टिकणारं आहे, ते त्या सांगून गेल्या आहेत. त्या मातेलाही जाणीव आहे. दूर कुठंतरी आपल्या काळजाचा तुकडा सासुरवास भोगत आहे त्यातून काही क्षणासाठी तरी त्याला विसावा मिळावा म्हणून आपणही या सासरीच्या कष्टासह इथं थांबायला पाहिजे. सासरी नांदायला पाहिजे. मायलेकीतला हा जिव्हाळा आहे त्यापाठी एक समदुःखीपण आहे. एक वेदनाही आहे.
 आणि म्हणूनच लोकगीतातली स्त्री म्हणते,

माय आहे तवर माहेर। बाप म्हणे येऊ जाऊ।
भाच्चे कवनाचे भाऊ। मना नको आशा लाऊ।
माय आहे तवर माहेर। बाप असा तसा भारी।
बंधवाची धर्मपुरी। भाचीयाची लंका दूरी।

 माहेर आणि माय याचं नात अतूट आहे. कधी बापाची माया थोडी उणी पडते कारण तो पुरुष आहे. इतर कितीही नातं-गोतं असलं तरी माय ती मायच सांगताना ती म्हणते,

मायेसारखी गं माया। येईना पुरुषाला।
संपादत नाही। दूध साळीच्या भाताला।

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ७६ ।।