पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि मग या वेदनेपोटी सासरच्या माणसांविषयी कधी मनात राग येतो; पण तो प्रत्यक्ष व्यक्त करता येत नाही. मग तो व्यक्त करायला आधार म्हणून तिच्या ओठावर ओवी येते,

चौघे दिर माझे नांदती।
कौलारि घर बांधती।
सासू माझी गं सागर।
नित घाली करकर।
नणंदा माझ्या गं हाणकारणी।
उठून टोला देती॥१॥
धाकली जाऊ माझी सुखवासी
कामाला हात नाई लावती
घरीच गरधंदा मी करिते
एकली पाण्याला जाते॥२॥

 आणि एवढे दिवस दिवस राबूनही पोटाला नीट जेवायला मिळेल, याची शाश्वती नाही.

भूक लागे माझ्या पोटा  परवंटा देत्ये गांठी
तुमच्या नावासाठी  बाप्पाजी हो

 पण तरीही मी तुमच्या नावासाठी म्हणजे वडिलांचं नाव जाऊ नये म्हणून इथं सगळं सहन करते.
 राजस्थानी भाषेतल्या एका लोकगीतातही सासरी केलेल्या कामाचे वर्णन येते. सगळे जत्रेला जातात. सुनेला दळायला सांगून जातात. बरोबरीच्या नणंदा खेळतात तेव्हा तिला पोळ्या करायला लावतात. इतरांना मुठी-मुठी साखर दिली जाते, तेव्हा सुनेच्या हातावर मात्र फक्त चिमटभर मीठ टेकवले जाते. इतरांना पळ्या भरून तूप वाटताना तिला चिमूटभर तेलाची धार नशिबी येते. आणि झोपायच्या वेळेला एक भाकरीचा तुकडा जेवण म्हणून मिळतो; पण तोही मांजरी पळवते आणि तिला रात्रभर उपाशी राहावं लागतं,

सोवतङी, ए मा, बाजर वाटियो
आण नै मिनडी लै गयो
मरज्यो मरज्यो, ए मिनडी, थारोडा पूत
म्हारोङो बाटियो तूं ले गयी
राताँ री निरणी वीरां री बहनडी

 एक विलक्षण कारुण्य अशा गीतातून सामोरं येतं. सासरचं वर्णन करणारी ही लोकगीतं विचार

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ७३ ॥