पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदर करावा, चांगल्याची संगत धरावी, परोपकार करावा, याचा उपदेश तो गेली कित्येक वर्षे करत आला आहे. वासुदेव दैववादी आहे. कृष्णसखा आहे.
 श्री. गो. मं. कालेलकर यांनी लिहिल्याप्रमाणे वासुदेव ही एक धार्मिक भिक्षेकऱ्यांची गावोगावी भटकणारी जाती आहे. साधारण दक्षिण महाराष्ट्रात ते सगळीकडे आढळतात. एका ब्राह्मण ज्योतिषास कुणबी बाईपासून झालेल्या सहदेव नावाच्या मुलापासून त्याची उत्पत्ती झाली आहे. वासुदेव मराठी कुणब्याप्रमाणे दिसतात. मुलगा भिक्षा मागण्याजोगा झाला, की त्याला ते दीक्षा देतात. या दीक्षा देण्याचाही विधी असतो. मुलाच्या वयाच्या पंधरा वर्षांच्या आतच शक्यतो त्याला दीक्षा दिली जाते शुभ दिवस पाहून उपाध्यायाला बोलावतात. तो मुलाला वासुदेवाचा पारंपरिक वेश घालायला लावतो. मंत्रोच्चारासहित त्याच्या कपाळाला चंदनाचा टिळा लावतो. नंतर उपाध्यायाला दक्षिणा दिली जाते व सर्व जातबांधव बरोबर भोजन करतात.

 वासुदेवांचे भिक्षा मागण्याचे इलाखे ठराविक असतात. त्यांची गावे ठरलेली असतात. यात्राजत्रेच्या कालावधीत त्या ठिकाणी हे वासुदेव उपस्थित असतात. इतर वेळी गावोगावी फिरत असतात. आता काळाच्या ओघात ही वासुदेव जाती नष्ट होते की काय, असे वाटायला लागले आहे. काही मराठी सिनेमांत वासुदेव दाखवला आहे. त्याची गाणीही आहेत. पुढे-मागे यातच याचे दर्शन उरेल काय, अशीही भीती वाटते; पण गेली कित्येक वर्षे तो लोकांना काही देतच आला आहे. भले मग ते त्याच्या गाण्यातून का असेना. त्याच्याकडे कोणी-कधी भिकारी म्हणून पाहिले नाही. मनात आदर बाळगून लोक त्याला नमस्कार करत आले आहेत. त्याला भिक्षा देणे हे सगळ्यांना कर्तव्य वाटत राहिले. लोकसंस्कृतीत वासुदेवाचे स्थान सदैव आदराचे राहील. शेवटी तो कृष्णसखा आहे, हे कोण विसरेल.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ६८॥