पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हरणीचे पाडस सगळ्या त्याच्या कुटुंबाचा कसा जीव वाचवते, ही कथा फारच विलोभनीय आहे. हरणीला पकडल्यावर हरणी बाळाला पाजून परत येते म्हणते, पाडसाला पाजताना पाडसाला तिचे दूध कडू लागते, हे वर्णन करताना वासुदेव म्हणतो...

खपीतनं बाळ आलं
माया दुदुड धावोनी।
घाली कासेमधी तोंड
चराचरा वडू लागे दूध
"दूध का गं कडू लागं
माते मजला सांग"

 हरणी काही सांगू शकत नाही. कारण बाळाला पाजून तिला पुन्हा मरणाच्या दाढेत जायचं असतं. ती म्हणते..

"पी बाळा जलदीनं
परतून मला जायचं पटकन"

 बाळ पीत नाही. हळूच आईमागून जाते आणि म्हणते...

“आज पुनवेची हरणं कापू नका तुम्ही
नाई परमाण
करा कवळ्या मासाचं भोजन”

 त्याचे ऐकून मग सगळ्यांना दया येते. पकडणारा सगळ्यांनाच सोडून देतो. वासुदेव जेव्हा गीतामधून ही कथा सांगतो, तेव्हा ऐकणाराचे डोळे पाणावतात. समाधानानं सूपभर धान्य त्याच्या झोळीत घातलं जातं.
 एका गाण्यात कुडी जीवाशी संवाद करते आहे. कुडी जीवाला म्हणते...

तुम्हि पाटिल अन् मी धर्माची चावडी
तुम्हि दोरा अन् मी आकाशी वावडी
तुम्हि गोसावी, मी परमसुखाची मठी
तुम्हि भुजगं अन् मी पेटाऱ्यातली कुडी
माझ्या ढगात तुमची बिजली वीज कडकडी
जिव जन्माचा संगती बोलती कुडी

 वासुदेवाची प्रतिभा ही विलक्षण आहे. त्याची कल्पना वेगवेगळ्या प्रतिमा, रूपकांमधून लोकांना सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. चांगलं वर्तन करावे, माणुसकी जतन करावी, मोठ्या माणसांचा

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ६७॥