पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छोटी घुगरं बांधलेली असायची. नाचताना त्याचा आवाजही टाळ-चिपळ्यांच्या आवाजात मिसळायचा. त्याच्या गळ्यातून स्त्रवणारं गाणं, टाळ-चिपळ्या-पुंगरांचा आवाज यानं एक छानसं नादब्रह्म निर्माण झाल्यासारखं व्हायचं.

 'घरातली स्त्री सुपामधून काही धान्य घेऊन यायची. त्याच्या झोळीत ते सूप रिकामं व्हायचं. मोठ्या भक्तिभावाने त्या वासुदेवाच्या कृष्णरूपी रूपाला ती नमस्कार करायची. मग आम्हीपण नमस्कारासाठी झुकायचो. दोन्ही हात उंचावून तो आशीर्वाद दिल्यासारखा करायचा. त्याला दान मिळालेलं असायचं. ते दान महाराष्ट्रातल्या सगळ्या देवांना तोपोचवल्यासारखे गाणं म्हणायला सुरवात करायचा...

दान पावलं  दान पावलं
पंढरपुरात  इठोबारायाला
कोंढणपुरात  तुक्काऽ बाईला
जेजुरीमंदी  खंडोबा देवाला
सासवडामंदी  सोपानदेवाला
आळंदीमंदी  ग्यानुबादेवाला
देहुमंदी  तुकारामबाबाला
शिंगनापूरच्या   महादेवाला..

.

 अशा या दैवतांची यादी मोठी असायची. नाचताना तो डोकं हलवायचा. त्याबरोबर त्याच्या डोक्यावरची मोरपिसाची टोपी हलायची. कधी नाचताना टोपीतलं एखादं मोरपिस गळून पडायचं. आम्ही ते चटकन उचलायचो. कधीकधी एखादं मोरपिस वासुदेवाकडून मागूनही घ्यायचो. त्या लहान वयात मोरपिसाचं खूप अप्रुप वाटायचं.

 वासुदेव हे खूप पूर्वीपासून असे गाणी म्हणत दारोदारी फिरत असावेत. हे किती जुने आहेत, कधीपासून वंशपरंपरागत रीतीने हे व्यवसाय ते करतात- हे सांगणे अवघड असले, तरी रा. चिं. ढेरे यांनी लिहिल्याप्रमाणे ते हजार-बाराशे वर्षांहून पूर्वीपासून हे काम करत असावेत. ज्ञानदेव-नामदेव यांच्या ओव्यात वासुदेवाची रूपके आढळतात. महानुभाव वाङ्मयातही वासुदेव असल्याचे पुरावे आहेत. महानुभाव पंथ संस्थापक चक्रधरस्वामी यांनी त्या काळात म्हटलेले एक गीत थेट वासुदेवाच्या गीत पद्धतीशी साम्य दर्शविणारे आहे.
 चक्रधरस्वामींचे गुरू गोविंदप्रभू यांच्या चरित्रातही 'भ्रीडी' या नावाने वासुदेवाचा उल्लेख येतो.

डोइये मोरपीसांची वेंठी : पीलीचे नेसला होता
माथां दौडी : आंगी नीलवर्ण उटि : हातीं चीपोळी

 असंजे वर्णन येते ते वासुदेवाशी साम्य असणारे असेच आहे. या सगळ्यावरून फार पूर्वीपासूनची

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥६२॥