पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषेचा बाजही जाणवतो.
 देवीचा भक्तपरिवार मोठा आहे. दर माघी पौर्णिमा आणि चैत्री पौर्णिमेला देवीच्या महत्त्वाच्या यात्रा असतात. यातही माघी पौर्णिमा ही रांडा पुनव व चैत्री पौर्णिमा ही अहेव पुनव मानली जाते.

 या सगळ्याच्या एक वेगळा अर्थ असाही लावला जातो, की रेणूकेची पूजा ही भूमीची पूजा आहे, निसर्गाची पूजा आहे. मार्गशीर्षात पिकांची कापणी होते या अर्थानं भूमीचं सौभाग्य नष्ट होते, तर पुन्हा चैत्रात वसंत ऋतू आल्यानं भूमी हिरवीगार होते. वृक्षांना पालवी फुटते. भूमी त्या अर्थानं पुन्हा सौभाग्यशालीनी बनते.

 देवीच्या पूजेत लिंब नेसणे नावाचा विधी येतो. तोही सृजनाशी, निसर्गाशी संबंधितच असावा.

 यल्लमाच्या जोगतीणी म्हणजे देवदासी. यांना काही नियम पाळावे लागतात. जेव्हा दर्शन त्यांच्या गळ्यात घालून त्यांना दीक्षा दिली जाते, त्या वेळी या नियमांचे पालन करावे, असा मंत्र गुरव वा गुरू त्यांना सांगतो.

 यात भक्तांशी विश्वासार्ह वर्तन करावं, असत्य बोलू नये, जोगवा मागून आणलेल्यातलं थोडंतरी शिल्लक ठेवावं, गावातील कोणी मृत झाल्यास त्याचे संस्कार झाल्याशिवाय तिथे जेवू नये, बाळंत स्त्रीच्या घरी सव्वा महिना जेवू नये, श्राद्धाचे जेवण जेवू नये, लग्न करण्याचा विचार मनात आणू नये, हे सांगितले जाते.

 त्याचप्रमाणे जोगतीणींनी सौंदत्तीला यात्रेला जाऊन परतल्यावर आंबिल यात्रा करणे म्हणून विधी सांगितला जातो. त्याशिवाय यात्रेला गेल्याचे पुण्य पदरात पडत नाही. ज्यांना काही कारणामुळे यात्रेतल्या सौंदत्तीला जाता येत नाही, ते या आंबिल यात्रेत सामील होतात. यात देवीला अभिषेक करतात तिची पूजा आरती करून नैवेद्य वाटला जातो.

 ज्या घरात यल्लमा हे कुलदैवत असते त्या घरी जेव्हा शुभकाम असेल, तेव्हा जोगतीणी लिंब नेसवण्यासाठी जातात. त्या विधीसाठी पाच देवदासी लागतात. चार तांदळाच्या रेघा मारून त्यावर त्या जग ठेवतात. पाचही जग दोऱ्याने गुंतवतात. त्यावर प्रसाद ठेवला जातो व लिंब नेसून त्याला प्रदक्षिणा घातल्या जातात.

 प्रत्येक जोगतीणीला पाच घरी जोगवा मागावाच लातो. दरवर्षी सौंदत्तीला यात्रेसाठी जावेच लागते.

 या सर्वाचे पालन शक्यतो जोगतीणीने करावे लागते.

 लोकसंस्कृतीमध्ये यल्लमाचे महत्त्व व तिचे उपासक म्हणून जोगती व जोगतीणीचे महत्त्व सांगितले गेले आहे; पण काळानुसार जोगतीणी वा देवदासी प्रथेचे बरे-वाईट परिणाम समाजासमोर येत राहिले. त्यावर प्रबोधन होत राहिले. या विषयावर नाटके, कादंबऱ्या कथा लिहिल्या गेल्या. त्यातून देवदासीच्या

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ५८॥