पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिला ओळखत नाही. तो चिंगळी देण्यास नकार देतो. तरी यल्लुमाता त्याच्या मळ्यात घुसू पाहाते. माळी नोकरांना तिला बाहेर काढायला सांगतो. यल्लुमाता ते पाहून कोपिष्ट होते. प्रचंड रूप धारण करते आणि कवडीतला अंगारा काढून माळ्याच्या अंगावर टाकून त्याला शाप देते.

'कवडीच्या माळेतला भंडारा काडला। त्याचे अंगावरनं झोकला।
आगीन जोडली त्याच्या अंगाला। राळ्याच्या कणीसारखं फोड उठलं त्याच्या अंगाला।
बचकत माईनासारखं फोड तेंच्या आंगाला। आणि रगात पू लागलं धरनीला गळायला।
वाटेची माणसं लागली नाक धरायला।'

 अशी माळ्याची परिस्थिती यल्लुमातेच्या शापानं झाली. देवी गुप्त झाली. माळीण सात्विक होती. ती माळ्याची सेवा करू लागली व देवीचा धावाही करू लागली. त्या धाव्याने यल्लुमाता शांत झाली जणू पुन्हा माळीणीवर प्रसन्न झाली. माळ्याच्या घरी आली

माळ्याच्या गुंफेत उदेकार जागला
कानी श्रवण केला
माळी लोळत घोळत आला चरण धरायला
'माझी यलारी! करतो तुझी भक्ती
आलो शरण, धरतो चरणागती'

 असं म्हणून देवीची करुणा भाकू लागला. यल्लुमाता भक्ताच्या भक्तीला जागली भावभोळी झाली. मनातला राग नाहीसा झाला. तिनं बेलभांडार शिववला. माळ्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याच्या अंगाला तोंड लावलं त्याचं दूषित रक्त जणू शोषून घेतलं.

तोंड लावलं तेच्या अंगाला
रगत ओढून घेतली मागं सरली
डर्र! करून ढेकर दिली
माळी साजिवंत केला

 अशा रीतीने यल्लमाच्या अनेक भक्तांनी तिचा महिमा गीतांतून गायिला आहे. हे सगळे भक्त ग्रामीण भागातील आहेत. त्यांची भाषाही तशीच आहे. जणू बोलल्याप्रमाणं त्यांनी गीतात भाव-शब्द गुंफले आहेत. त्या गीतात शेवटी स्वत:चे नावही जोडले आहे. यल्लू परसू, कृष्णाजी, आबा हरी, यशोदा, तानू, भागू, सत्तू अशा त्या रचनाकारांची नावे 'एक होता राजा' मधील यल्लमाच्या गाण्यात आढळतात. देवीचं सौंदत्ती देवस्थान असल्यामुळे त्या आजूबाजूच्या गावात तिचे जास्त भक्त असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा व धारवाड, बेळगाव वगैरेच्या जवळ यांची गावे आहेत. त्याचीही नावे गाण्यातून येतात. या गाण्यामध्ये बरेच वेळा कानडी

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ५७॥