पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दैत्य सारून माळ मी घालीन
हाती बोधाचा झेंडा मी घेईन
भेदरहित वारीला जाईन
जोगवा अनाथ निरगुण प्रकटली भवानी
मोह महिषासूर मर्दाना लागूनी
जोगवा नवविध भक्तिच्या भक्तिच्या नवरात्रा
तरुण पोटी मागेल ज्ञानपुत्रा
धरून सद्भाव अंतरीच्या मित्रा
दंभ सासरा सारीन कुपात्रा
जोहाती बोधाची भरीन परडी
आशा निष्ठाच्या पाडील दरडी
मन विकार करीन कुरवंडी
अद्भूत रसाची भरीन दुरडी
काम क्रोध झोडियेले मग केला मोकळा मार्ग सुरंग
देविचा जोगवा मागून ठेविला

.

 देवीला विशिष्ट नवस बोलले जात. ते पूर्ण झाले की मग माया भगिनी हे जोगवा मागण्याचं व्रत करत. अजूनही खेड्यात काही बायका मंगळवारी, शुक्रवारी पाच घरं जोगवा मागतात. ते एक प्रकारच व्रत मानतात. यल्लम्मा देवी ही उग्र मानली आहे. कडक देवस्थान म्हणून तिची ख्याती अहे.
ती जर कोपली तर काय होतं सांगताना

आदिमाया शक्ति जगदंबा कारी
सुंडी मुंडी रुंडी भुटकी महामारी
पिलीक पटकी यापैकी देवी हाई विष्णु अवतारी
आदिमाया शक्ति रेणुका जगदंबाकारी

 असं वर्णन एका गीतात येतं. तिनं कोप धारण केला, तर साथीचे रोग निर्माण होतात. महामारी येते, पटकी येते, अशी लोकांची समजूत गीतातून जाणवते.

 यल्लम्मा देवी काही वेळा भक्तांची परीक्षा घेत असते. त्यात तो सफल झाला, तर त्याचं कल्याण करते. त्याच्याकडून चूक झाली तर कोपिष्ट होते; पण परत तिचा धावा केला तर मदतीलाही जाते. ही यल्लुमाता परशुरामाबरोबर एका माळ्याची परीक्षा घ्यायला जाते, याची कथा एका गीतात येते. ती एका माळ्याच्या घरी जाते. त्याच्या मळ्यात जाऊन त्याच्याकडे कांद्याची चिंगळी मागते. माळी

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ५६ ॥