पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'भेटासूर आला चालून, यल्लुआई म्हनली परसुरामा, उडवू डोस्कं परसुरामानं डोस्कं उडावलं, कवटीच्या वरच्या कपचीचं टाळं केलं, उरल्या कपचीचं चौंडकं केलं. त्याला आतड्याची तार बसविली.'

 असं वर्णन चौंडक्याबद्दल येतं.
 तुणतुणं हे तंतुवाद्यच असतं. लाकडी भांड्याला एका बाजूला कातडी बसवलेली असते. लाकडी भांड्याला तिरकस दांडी असते. कातड्यामधून तार ओवून वर दांड्याला जोडली असते. ज्या खुंटीला वर तार जोडली असते ती खुंटी पिळून तारेला हवा तसा ताण देता येतो

 जोगवा मागायला जाताना चौंडकं, तुणतुणं, टाळ या वाद्यांच्या साहाय्याने यल्लमाची गाणी म्हणून जोगवा मागितला जातो.

 यल्लमाची गाणी म्हटल्यावर भंडाऱ्याच्या पिशवीतून भंडारा काढून जोगता किंवा जोगतीण तो इतरांच्या कपाळावर लावतात.

येलू तुझी महिमा मोठी
चला घेऊ भंडार वाटी

 अशी ओळ गाण्यात आढळते. कोणी आजारी पडलं वा नवस बोललं, की भंडारा उधळला जातो. मग त्या नवसातून मुलं मुली देवीला सोडू बोललं जातं. यातून देवदासी प्रथा निर्माण झाली. ज्या वेळी जेंव्हा सोडलेल्या मुलीचं देवीशी लग्न लावतात, त्या वेळी लाल-पांढऱ्या मण्याची माळ तिच्या गळ्यात घालतात तिला दर्शन म्हणतात. यात लाल मणी वासनेच्या उद्वेगाचे, तर पांढरे मणी निर्मलत्वाचे प्रतीक मानले जातात. मरतेवेळी जोगतीण हे दर्शन दुसऱ्या मुलीच्या गळ्यात घालते म्हणजे थोडक्यात पुन्हा एक जोगतीण निर्माण करते. त्याशिवाय तिला मोक्ष मिळत नाही, अशी कल्पना आहे. त्यामुळे देवदासी प्रथा चालू राहील, अशी सोय झाली आहे.

 या देवदासी झालेल्या जोगतीणींच्या गळ्यात कवड्याची माळ असते. जग व परडीही अशा माळांनी सजवली जाते. कवडी हे योनीचे, जीवन सातत्याचे प्रतीक मानले जाते. रा. चिं. ढेरे यांनी लज्जागौरीत जोगतीणी विषयी एक गाणं दिलं आहे.

यल्लु मंगळवारा दिशी। यल्लु शुक्रवारा दिशी।
आली डोंगर उतरूनीया
भंडार इभुतीचा मळवट भरती
वर कुंकवाचा टिळा लेती
माळ, परडी शिक्का घेती
यल्लु जोगवा मागती

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ५४॥